गोंदिया एसटी आगार : ८७ बसेस धावल्या १४.१५ लाख किमीचे अंतर देवानंद शहारे । लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासाला प्रवाशांकडून चांगली पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या व लग्नसराईची धूम यामुळे एसटी बसेस भरभरून जात असल्यानेच गोंदिया एसटी आगाराने केवळ ४९ दिवसांत ३.७८ कोटींची कमाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य परिवहन महामंडळ अलीकडे प्रवासी वाढविण्यासाठी नवनवीन योजना आखत आहे. त्यातच काही योजनांना अमलात आणणेसुद्धा सुरू करण्यात आले आहे. मागील वर्षी प्रवासी वाढवा मोहीम राबविण्यात आली होती. यानंतर प्रवाशांच्या विम्यापोटी तिकिटावर एक रूपया अधिक शुल्क लागू करण्यात आले होते. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांनाही प्रवासात सुट-सवलत दिली जाते. विद्यार्थ्यांनाही सवलतीत प्रवासाची संधी मिळते. तर मानव विकास कार्यक्रमाच्या बसेसमधून विद्यार्थिनींना नि:शुल्क प्रवासाची सेवा दिली जाते, यासह अनेक योजना राबविल्या जात आहेत. एप्रिल महिन्यात सर्वच आगारांसह गोंदिया आगारातीलही स्कूल बसेस शाळा बंद असल्याने फेऱ्या बंद करण्यात आल्या. गोंदिया आगारात एकूण २८ मानव विकास कार्यक्रमाच्या स्कूल बसेस आहे. शाळा बंद झाल्यामुळे त्यांना एप्रिल महिन्यापासूनच जिल्ह्यांतर्गत प्रवासी सेवेसाठी लावण्यात आले. त्यामुळेही उत्पन्न वाढीसाठी मदतचझाली. गोंदिया आगारात मानव विकासच्या स्कूल बसेस, मिडी बसेस व इतर सर्व बसेस मिळून एकूण ८७ बसेस आहेत. या सर्व बसेसने १ एप्रिल ते १९ मेपर्यंत १४ लाख १५ हजार ३०३.७ किमीचा प्रवास पूर्ण केला. त्याद्वारे गोंदिया आगाराला तीन कोटी ७८ लाख ४० हजार ६२५ रूपयांचे उत्पन्न केवळ ४९ दिवसांत मिळाले. यात १ ते ३० एप्रिलपर्यंत गोंदिया आगारातील बसेस ८ लाख ५६ हजार ५७३.८ किमी धावल्या. त्याद्वारे आगाराला २ कोटी १८ लाख २८ हजार ५९१ रूपयांचे उत्पन्न मिळाले. तर १ ते १९ मेपर्यंत या बसेस ५ लाख ५८ हजार ७२९.९ किमी अंतर धावून गोंदिया आगाराला १ कोटी ६० लाख १२ हजार ०३४ रूपयांचे उत्पन्न मिळवून दिले. सद्यस्थितीत लग्नसराईची धूम सुरूच असल्याने व प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने गोंदिया आगाराच्या उत्पन्नात वाढ होत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. वाय फाय सुविधेपासून १० बसेस वंचित गोंदिया आगारात एकूण ८७ बसेस आहेत. यापैकी १० बसेस सोडून उर्वरित इतर सर्व बसेसमध्ये वाय फाय सुविधा देण्यात आलेली आहे. वाय फाय सुविधेपासून वंचित असलेल्या सदर १० बसेसमध्येसुद्धा लवकरच ही सुविधा देण्यात येईल, असेही सूत्रांनी सांगितले आहे. खासगी वाहतुकीचा एसटीवर डल्ला गोंदिया बस स्थानकाजवळून काळीपिवळी व इतर खासगी प्रवासी वाहतूक करणारे एसटीचे प्रवासी पळवून नेतात. येथे काळीपिवळी धारकांचे काही सहकारी प्रवासी असल्याचे बस स्थानकात प्रवेश करतात व सरसकट प्रवाशांना लवकर पोहोचवून देण्याचे आमिष देवून एसटीच्या प्रवाशांना घेवून जातात. त्यामुळे एसटी उत्पन्न प्रभावित होते. तर पाल चौकातून मिडी बसेस अद्यापही सुरू करण्यात न आल्या रेल्वे स्थानकातून इतरत्र जाणारे प्रवासी काळीपिवळी व इतर खासगी वाहतूक साधनांचा आधार घेतात.
ेएसटीला ४९ दिवसांत ३.७८ कोटींचे उत्पन्न
By admin | Published: May 27, 2017 12:44 AM