आमगाव : निर्भया प्रकरणानंतर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांवर वचक बसावा म्हणून शिक्षेसाठी आवश्यक वय १८ वरून १६ वर्षे आणण्याचे विधेयक संसदेत पारित करण्यात आले. आज समाजात वाढती गुन्हेगारी, मोबाईल, टीव्ही, इंटरनेट यामुळे वाढत आहे. सायबर क्राईम नावाची नवीन संकल्पना तयार झाली आहे. या स्थितीतून मार्ग काढायचे असेल तर विद्यार्थ्यांमध्ये नैतिक शिक्षण आवश्यक विषय करणे काळाची गरज आहे, असे उद्गार पोलीस निरीक्षक बी.एन. औंटी यांनी काढले. आदर्श विद्यालयात महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य जी.आर. मच्छिरके होते. याप्रसंगी उपप्राचार्य एम.एन. कोटांगले, पर्यवेक्षक प्रा. रंजीतकुमार डे, पर्यवेक्षिका शर्मा, जोशी उपस्थित होते. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलीस विभागातर्फे आदर्श विद्यालयाच्या सहकार्याने नगरातून प्रभातफेरी काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबांसाहेबांच्या प्रतिमेला ठाणेदार बी.एन. औटी व विनायक अंजनकर यांनी माल्यार्पण केले. यानंतर पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांना बिस्कीट वितरित करण्यात आले. आदर्श विद्यालयात ठाणेदार बी.एन. औटी यांच्या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांचे समर्पक उत्तर औटी यांनी दिले. संचालन विनायक अंजनकर यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
नैतिक शिक्षण काळाची गरज- औटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2016 1:36 AM