जिल्ह्याच्या शेवटी टोकावर असलेल्या अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या विकासात भर घालणारे आणि पर्यटन स्थळापैकी एका इटियाडोह जलाशय या परिसरातील शेतकऱ्यांची सिंचन व्यवस्था पूर्ण करीत आहे. तर संजयनगर व रामनगर या वस्तीमधील निर्वासित बंगाली बांधवांचा महत्वाचा व्यवसाय मासेमारी असून वर्षभर ते या व्यवसायातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दररोज रात्री इटियाडोह जलाशयाच्या खोलवर जाऊन जाळे टाकतात व पहाटेला जाळ्यातील मासे विविध प्रकारच्या मासेमारीच्या कंत्राट झालेल्या मासेमार सोसायटीला देतात. सोसायटी मासे थेट नागपूरला पाठवितात. दर आठड्यात संबंधित सोसायटी बंगाली बांधवांना ४०० रुपये प्रतिदिवस रोजी देऊन मासेमारीचा मोबदला देतात. बंगाली बांधव अत्यंत धोकादायक पद्धतीने मासेमारी करीत आहेत. त्या प्रमाणात त्यांना मोबदला मिळत नसल्याची खंत बंगाली बांधवांनी व्यक्त केली आहे. बाराही महिने मासेमारीचा व्यवसाय चालत असल्याने बंगाली बांधवांचे आर्थिक स्तर उंचावले असून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे हे निश्चित. त्यामुळे मासेमारांना इटियाडोह धरण जीवनदायिनी ठरत आहे.
इटियाडोह जलाशय ठरताेय बंगाली बांधवांसाठी जीवनदायिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 4:18 AM