मुख्य प्रवाहापासून दूर : आई-वडील मजुरीवर, मुले करतात भटकंती, शैक्षणिक गंधही नाहीनरेश रहिले गोंदियाबेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांना त्यांच्या मात्यापित्यांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभागाने सुरू केलेल्या आॅपरेशन मुस्कानमध्ये गोंदिया जिल्ह्यात २२ बालकांना शोधून काढल्याचे दाखविण्यात आले. परंतु केवळ बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करणे एवढे सोपस्कार करून पोलीस मोकळे झाले असले तरी भटकंती करणाऱ्या आणि मुख्य प्रवाहापासून भरकटलेल्या त्या बालकांच्या जीवनात कोणताही बदल झालेला नाही. अजूनही ते पूर्वीसारखेच जीवन जगत आहेत. केवळ अपहरण किंवा बेपत्ता झालेल्याच नाही तर आई-वडिलांपासून दुरावलेल्या आणि वाईट संगतीत लागलेल्या किशोरवयीन मुलांनाही या मोहिमेत पोलिसांनी पकडून त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. यात गोंदिया शहरातील रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत रेल्वे स्थानक परिसरात भटकंती करणाऱ्या सहा बालकांना पोलिसांनी पकडले होते. परंतु त्या सहापैैकी तीन बालकांचे आईवडील नसल्यामुळे त्यांना नागपूर येथील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे, तर तीन बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. ज्या बालकांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले त्या बालकांची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांची स्थिती या अभियानानंतरही ‘जैसे थे’ असल्याचे सत्य दिसून आले.शासनाने हरविलेल्या किंवा बेपत्ता असलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांच्या मात्यापित्यांच्या स्वाधीन करण्यास सांगितले. परंतु रामनगर पोलिसांनी बालकांचा आकडा वाढविण्याच्या दृष्टीने रेल्वेस्थानक परिसरात फिरणाऱ्या तीन बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करून त्यांना रेल्वे स्थानकावर फिरू देऊ नका असे सांगितले. ही बालके अपहरण झालेली किंवा बेपत्ताही नव्हती. दिवसभर शहरात फिरत असली तरी ती बालके सायंकाळी स्वत:च्या घरी जात होती. मग अश्या बालकांना पकडून त्यांच्या आईवडीलांच्या स्वाधीन करण्यामागे पोलिसांचा काय हेतू होता? जी बालके बेपत्ता आहेत, ज्यांचे अपहरण झाले आहे, अश्या बालकांना पकडणे गरजेचे होते. परंतु त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. ज्या तीन बालकांना नागपूरला पाठिवण्यात आले त्या बालकांचे पालक नसल्यामुळे त्यांची सुधारगृहात रवानगी करण्यात आली. परंतु सुधारगृहात पाठविल्यानेच ती बालके मुख्य प्रवाहात येतील का? असा प्रश्न आहे. कटंगीकला येथील यशकुमार गुलाब भुते (९) याचे आईवडील नसल्याने त्याला त्याचे नातेवाईक आशा भांडारकर यांच्याकडे ठेवण्यात आले. रेलटोली येथील साहिल सुनील भांडारकर (१४) या बालकाला त्याची आई आशा भांडारकर हिच्या स्वाधीन करण्यात आले. आकाश दिलीप यादव (१६) रा.कचरा मोहल्ला याला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र अशा बहुतांश बालकांचे मोलमजुरी करणारे आई-वडिल दिवसभर घरी नसतात. शाळेत ही मुले रमत नाहीत. त्यामुळे दिवसभर भटकंती करून मनात येईल ते करण्याची आणि वागण्याची त्यांची सवय आजही कायम आहे.मुख्य प्रवाहात कोण आणणार?ज्या बालकांना आॅपरेशन मुस्कानच्या माध्यमातून पकडण्यात येते त्या बालकांचे मातापिता नसल्यास त्या बालकांच्या शिक्षणाची, राहण्याची, खाण्यापिण्याची सोय शासनाने करून देणे आवश्यक आहे. परंतु तसे झाले नाही. ज्या बालकांचे मातापिता मिळाले त्यांच्या त्यांच्या स्वाधीन केले. पण ज्यांचे मातापिता नाहीत त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली. त्यामुळे त्या बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाची सोय कोण करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.सामाजिक संघटना उदासीनया बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. परंतु या बालकांना त्यांच्या हक्काचे शिक्षण देणे या मूळ संकल्पनेला तिलांजली देऊन फक्त त्यांना त्यांच्या आई-वडीलांच्या स्वाधीन करणे, आई वडील नसल्यास बालकल्याण समितीपुढे उभे करण्यापर्यंतचे काम पोलिस करतात. समितीने त्या बालकांना बालसुधारगृहात पाठविण्यास सांगितल्यावर पोलीस त्या बालकांना नेऊन सोडून देतात. त्यानंतर त्या बालकांकडे दुर्लक्ष केले जाते. या बालकांना इतर बालकांप्रमाणे सर्व प्रकारचे हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
‘आॅपरेशन मुस्कान’नंतरही त्यांचे जीवन ‘जैसे थे’
By admin | Published: July 29, 2015 1:26 AM