कपिल केकत
गोंदिया : एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनाची धडपड सुरू असून यातूनच सक्तीने शिक्षणाचा अधिकार उदयास आला आहे. त्यानुसार, जिल्ह्यात प्रत्येकापर्यंत शिक्षण पोहोविण्यासाठी शिक्षण विभाग कार्यरत आहे. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना पुस्तके व गणवेशही उपलब्ध करवून दिला जात आहे. आता नवीन शिक्षण सत्र सुरू होणार असून यासाठी शिक्षण सर्व शिक्षा विभागाने ७५४१६ विद्यार्थ्यांसाठी गणवेशाचे नियोजन केले आहे. यासाठी सुमारे सात कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
‘शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही’ या म्हणीची प्रचिती कित्येकांच्या जीवनात आली असून त्यामुळेच शासन या म्हणीला आपले ब्रीद माणून कार्य करीत आहे. शासनाने प्रत्येक वर्गातील मुलांना शिक्षण मिळावे, शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अंमलात आणला आहे. त्यानुसार, शिक्षण विभागाकडून एकही मूल सुटू नये यासाठी प्रयत्न केले जातात. मुले शाळेपर्यंत पोहोचली की त्यांच्यात शाळेप्रती आवड निर्माण व्हावी, म्हणून शासनाकडून त्यांना नवीन पुस्तके, गणवेश, शालेय साहित्य व पोषण आहार यासारख्या सुविधा पुरविल्या जात आहेत. आता सन २०२० पासून प्रत्यक्ष शाळा भरल्या नसल्या तरीही शासनाकडून प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सुविधा घरपोच दिल्या जात आहेत. त्यात नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत असल्याने शिक्षण विभाग पुन्हा कामाला लागला आहे. शासनाकडून सर्व मुली, अनु. जमाती (एसटी) मुले, अनु. जाती (एससी) मुले व दारिद्र्य रेषेखालील मुलांनाच गणवेश दिले जात असून यंदा शिक्षण विभागाने गणवेशासाठी ७५४१६ विद्यार्थ्यांची नोंद केली असून तसा प्रस्ताव सादर केला आहे. यासाठी सुमारे सात कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना गणवेशासाठी आरक्षणाची अट असल्याने त्यानुसारच गणवेशाची पूर्तता केली जाते.
-----------------------------
विद्यार्थ्यांना गणवेश वाटपात दुजाभाव नकोच
जिल्ह्यात इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंत यंदा ९५ हजार ७८८ विद्यार्थ्यांसाठी सर्व शिक्षा अभियानाकडून पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांला शासनाकडून पुस्तके दिली जातात. गणवेश वाटप करताना त्यात कसल्याही प्रकारचा दुजाभाव नको.
--------------------------
अशी आहे गणवेशासाठी वर्गवारी...
सर्व शिक्षा अभियानांतर्गत ७५४१६ विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या गणवेशाच्या नियोजनात ३७७५० मुली, ७१४० अनु. जमाती मुले, ४०४५ अनु. जाती मुले, तर २६४८१ दारिद्र्य रेषेखालील मुलांचा समावेश आहे. यानुसार, जिल्ह्यात गणवेश वाटपासाठी सर्व शिक्षा अभियानाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मात्र उरलेल्या विद्यार्थ्यांना गणवेशापासून मुकावे लागणार आहे.