सालेकसा : येत्या ११ मार्च रोजी महाशिवरात्री असून यानिमित्त शिवभक्तांची गर्दी वाढेल असे कसलेही आयोजन करण्याचे टाळावे, असे आवाहन तालुका प्रशासनाने तालुक्यातील जनतेला केले आहे.
दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त ४-५ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यादरम्यान मोठ्या संख्येने भाविक व सर्वसामान्य जनता गर्दी करते. सद्य:स्थिती बघता तालुक्यात कोरोना संक्रमण नियंत्रणात असले तरी देवदर्शनासाठी जिल्ह्यातून आणि इतर प्रांतातून आलेेले भाविक मुक्कामीसुद्धा असतात व सतत एकमेकांच्या संपर्कात येतात. अशात कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यास हानिकारक होईल या अनुषंगाने यात्रा भरविणे व विविध कार्यक्रम आयोजित करणे मोठे परिणामकारक व जीवाला धोका निर्माण करणारे ठरू शकते. ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांच्या आदेशावरून गर्दी करणारे आयोजन टाळावे, असे आवाहन प्रत्येक शिवालय व त्यासंबंधित संस्थांना करण्यात आले आहे.