बोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील खांबी हे लहानशे खेडेगाव. सर्वत्र कोरोना संक्रमणाचे लोण पसरले. अशातच ध्यानी-मनी नसताना खांबी गावात एकाएकी कोरोनाबाधितांची संख्या वाढली. गावासह परिसरात कोरोनाचे संक्रमण होऊ नये, गावात होणारा कोरोनाबाधितांचा उद्रेक लक्षात घेता उपविभागीय अधिकारी कार्यालय अर्जुनी-मोरगावच्या वतीने ८ एप्रिल रोजी खांबी हे संपूर्ण गाव कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले होते. प्रतिबंधित क्षेत्र घोषित होताच गावात येणारे सर्व आवागमनाचे रस्ते, सीमा बंद करण्यात आल्या होत्या.
ग्रामस्थांनी आदेशाप्रमाणे तंतोतंत अटी, नियमांचे पालन केले. बाधितांनी गृहविलगीकरणात राहून नियमित औषधोपचार केला. गावात निघालेल्या सर्व कोरोनाबाधितांनी निर्धास्तपणे कोरोनावर मात केली. अखेर सोमवारी (दि. ३) तालुका प्रशासनाने खांबी गावातील कंटेन्मेंट झोनची बंदी उठविली. सर्व आवागमन रस्ते खुले झाले. कंटेन्मेंट झोन बंदी उठल्याने गावात चैतन्यमय वातावरण आहे.
खांबी हे ३४० कुटुंबांचे गाव. १ हजार १२६ लोकवस्ती, मोठ्या गुण्यागोविंदाने राहतात. गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना वेळोवेळी सतर्क करण्यात येते. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन केले जाते. गावामध्ये कोरोना चाचणी करण्यात आली. पाहता-पाहता त्यामध्ये गावातील २३ जण कोरोनाबाधित आढळून आले. गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तालुका प्रशासनाने याची गंभीर दखल घेत ८ एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने खांबी हे संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. गावात येणारे व जाणारे सर्व मार्ग, सीमा बंद करण्यात आल्या. पोलीस गस्त लावण्यात आली. प्रतिबंधित क्षेत्र घोषित असतानाच गावातील आणखी काही जण बाधित आढळून येऊन ३१ पर्यंत कोरोना बाधितांचा आकडा वाढला. परत प्रतिबंधित क्षेत्र आदेशात वाढ करून कडक निर्बंध लावण्यात आले.
बॉक्स
ग्रामस्थांच्या संयमाने कोरोनावर मात
गृहविलगीकरणात असलेल्यांना आरोग्य पथकाने नियमित वेळोवेळी गृहभेटी घेऊन औषधी पुरवठा केला. तापमान, ऑक्सिजनची नियमित तपासणी केली. सकस आहार, नियमित औषधोपचार घेत खांबीवासीयांनी अखेर कोरोनावर मात केली. घरामध्ये अलगीकरणात राहून सकारात्मक विचार मनात आत्मकेंद्रित केल्याने व नियमांचे तंतोतंत पालन केल्याने कोरोनावर मात केल्याचे बऱ्या झालेल्यांनी सदर प्रतिनिधीजवळ सांगितले.
......
विवाह स्थगित
गाव कंटेन्मेंट झोन घोषित झाल्याने गावातील सुज्ञ नागरिकांनी गावात कोणतेही वैवाहिक कार्यक्रम करायचे नाही असे ठरविले होते. प्रतिबंधित क्षेत्र घोषित झाल्यावर गावात तीन तरुणींचे लग्न होते. सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून त्या सुज्ञ पालकांनी आपल्या मुलींचे लग्नकार्य स्थगित करून बंदी उठल्यानंतरच विवाह सोहळा पार पाडण्याचा निर्णय घेतला.