गोंदिया : जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनने गुरुवारपासून (दि.२०) जिल्ह्यातील देवरी आणि गोरेगाव तालुक्यातील एकूण चार धानखरेदी केंद्रावरून रब्बी हंगामातील धानखरेदीला सुरुवात केली. पहिल्याच दिवशी चार केंद्रांवरून खरेदीला सुरुवात झाल्याने रब्बी धान उत्पादक हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
गुरुवारी देवरी तालुक्यातील सहकारी शेतकी खरेदी-विक्री समितींअंर्तगत पांढरी, जय दुर्गा माँ महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्या पांढरी संस्थाअर्तंगत केंद्र धानोरी, गोरेगाव तालुक्यातील विकास अभिनव सहकारी संस्था मोहाडी, मांडोदेवी शेती उद्योग साधनसामग्री पुरवठा व खरेदी-विक्री सहकारी संस्था मर्या. दवडीपार संस्थेअंर्तगत केंद्र दवडीपार या केंद्रावर धान खरेदीला प्रारंभ करण्यात आला. रब्बी हंगामातील धानखरेदी सुरू करण्यासंदर्भात मंगळवारी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह मुंबई येथे चर्चा केली होती. या बैठकीत या दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांनी तीन दिवसांत धानखरेदी सुरू करण्याचे आश्वासन खासदार प्रफुल्ल पटेल यांना दिले होते. गुरुवारपासून धानखरेदीला प्रारंभ झाल्याने त्याची पूर्तत: झाली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत रब्बीसाठी एकूण ११४ शासकीय धानखरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. जसेजसे गोदाम उपलब्ध होतील तसेतसे धानखरेदी केंद्राची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे मार्केटिंग फेडरेशनचे महाव्यवस्थापक अतुल नेरकर यांनी सांगितले. दरम्यान, रब्बी हंगामातील धान खरेदीला सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याबद्दल त्यांनी खासदार प्रफुल्ल पटेल व माजी आ. राजेंद्र जैन यांचे आभार मानले.
.........
३१ मेपर्यंत करता येणार नोंदणी
रब्बी हंगामातील धानाची शासकीय धानखरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी सातबाराची ऑनलाइन नोंदणी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या संकेतस्थळावर करावी लागणार आहे. यासाठी आधी ३० एप्रिलपर्यंतच मुदत होती. मात्र आता याला ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे सर्वच रब्बी धान उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय धानखरेदी केंद्रावर धानाची विक्री करता येणार आहे.
............
धानखरेदीची हेक्टरी मर्यादा वाढवा
शासकीय धानखरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी शासनाने मर्यादा आखून दिली आहे. यानुसार हेक्टरी ४३ क्विंटल धान शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणार आहे. मात्र खरिपापेक्षा रब्बी धानाची उतारी अधिक असून, एका हेक्टरमध्ये ६० क्विंटलहून अधिक धान होत आहे. त्यामुळे उर्वरित धानाची विक्री कुठे करायची? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे धानखरेदीची हेक्टरी मर्यादा ६० क्विंटल करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.