- वडेगाव-सडक येथील योजना : योजना सुरू झाल्याने गावकऱ्यांना आनंद
सडक-अर्जुनी : एजंसीला पैसे न दिल्याने पाणी पुरवठा योजना बंद होती. तालुक्यातील वडेगाव-सडक येथील हे प्रकरण असून, याप्रकरणी हा प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणला. त्याची दखल घेत विद्यमान सरपंच व सदस्यांनी योजनेसाठी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला व अखेर आज ती योजना सुरू झाली आहे.
सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात ग्रामपंचायत वडेगाव-सडकच्या माध्यमातून गावातील सदाशिव पाटीलटोला येथील नागरिकांना पिण्याचे पाण्याची समस्या लक्ष्यात घेऊन लघु सौर ऊर्जा पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली होती; मात्र तत्कालीन सरपंच व सचिवांच्या भ्रष्ट नीतीमुळे योजनेत मोटारपंप लावणाऱ्या एजंसीला पैसे देण्यात आले नसल्याने त्यांनी योजनेतील मोटारपंप काढून नेला, अशी चर्चा होती. परिणामी योजना बंद पडून होती सदाशिव पाटीलटोला येथील नागरिक पाण्यापासून वंचित होते. हे प्रकरण ‘लोकमत’ने ‘पाणी पुरवठा योजनेचा बट्ट्याबोळ’ अशा मथळ्याखाली बातमी प्रकाशित करून उजेडात आणले होते.
यावर विद्यमान सरपंच हेमराज खोटेले व ग्रामपंचायत सदस्य गिरीपाल फुले यांनी जिल्हा परिषदेत योजनेला घेऊन पाठपुरावा केला व वरिष्ठांचे लक्ष वेधले. अखेर ५ वर्षांनंतर ही पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे गावात मुबलक पाणी येत असून, गावकऱ्यांची पाण्याची समस्या सुटली आहे.
..............................
सदाशिव पाटीलटोला येथील नळ योजना सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेत हे प्रकरण वेळोवेळी लावून धरले व वरिष्ठांचे लक्ष वेधून ती योजना सुरू करण्यात आली आहे.
गिरीपाल फुले
ग्रामपंचायत सदस्य
वडेगाव
........................