केशोरी : तालुक्यासह केशोरी परिसरात कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. प्रत्येक गावातील जनजीवन भयभीत झाल्याचे चित्र आहे. गावच्या ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन सोडियम हॉयपोक्लोराइड जंतुनाशक औषधीची फवारणी करून गाव निर्जंतुकीकरणाची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागातील गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत नसतानाही ग्रामपंचायत प्रशासनाने आपले गाव निर्जंतुकीकरण केले होते. परंतु आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरापेक्षा ग्रामीण भागातील प्रत्येक गावात कोरोना या महामारीने उग्ररूप धारण करून थैमान घातले आहे. आरोग्य विभागाने सुरू केलेल्या तपासणीत प्रत्येक गावात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोना रुग्णांना घरातच राहून औषधोपचार करण्याचा सल्ला देऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाय केले जात असले तरीही कोरोनाचा वाढलेला संसर्ग लक्षात घेता गावात सोडियम हॉयपोक्लोराइड या जंतुनाशक औषधीची फवारणी करून गाव निर्जंतुक करण्याची जबाबदारी प्रत्येक ग्रामपंचायत प्रशासनाने उचलणे गरजेचे झाले आहे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.