सुश्री साधना रोंघे : हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ आमगाव : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आदर्श गाव कसे असावे यावर भर टाकण्यासाठी लिहिलेल्या ग्रामगीतेला वाचून आदर्श ग्रामाची संकल्पना पूर्ण करावी. मुलांच्या शिक्षणात ग्रामगीतेचे वचन कामी पडणारे आहे. यासाठी प्रत्येकाने ग्रामगीता वाचावी असे आवाहन कथाव्यास सुश्री साधना रोंघे यांनी केले. त्या पदमपूर येथील श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४८ व्या पुण्यतिथी निमित्त श्रीमद् कथा भागवत ज्ञान यज्ञाच्या समारोपा प्रसंगी गोपाळकाला करताना त्या बोलत होत्या. २५ ते १ जानेवारी दरम्यान आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञात विविध प्रसंगातून त्यांनी आदर्श गाव, देशाचा तरुण, समाजकार्य, महिला सक्षमीकरण, संस्कारक्षम पिढी कशी होईल यावर मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार रामरतन राऊत अतिथी म्हणून व्यापारी संपत सोनी, नरेश रहिले, सुरेंद्र नायडू, आडकू वंजारी, डॉ. भरतलाल हुकरे, ज्ञानीराम डोये उपस्थित होते. श्री गुरुदेव सेवा महिला भजन मंडळ व भवभूती महिला भजन मंडळाकडून दहीहंडी काढण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन शोभाराम तावाडे तर आभार नरेश रहिले यांनी मानले. कार्यक्रमाचा समारोप महाप्रसादाने झाला. गावातील हजारो नागरिकांनी महाप्रसाद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अशोक चुटे, शंकर वारंगे, ललीत भांडारकर, ग्यानीराम ठाकरे, श्रीकृष्ण डोये, पुनाराम भांडारकर, जगदीश चुटे,गंगा हुकरे, यशोदा रहिले, शांता बागडे, सिता वारंगे, विना डोये, मुन्नी मेश्राम व श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
प्रत्येकाने वाचावी ग्रामगीता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2017 12:55 AM