गोंदिया : तालुक्यातील एकोडी येथील ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या कामांची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीला घेवून येथील माजी पंचायत समिती सदस्य जयचंद बिसेन यांनी बुधवारी (दि.२४) गावातील पाणीटाकीवर चढून वीरुगीरी आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत जिल्हाधिकारी, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी येथे येऊन चौकशीचे लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत पाणीटाकीवरुन खाली उतरणार नाही अशी भुमिका बिसेन यांनी घेतली आहे.
या घटनेची माहिती गंगाझरी पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक व पोलिस कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले आहे. तर गोंदिया पंचायत समितीचे अधिकारी सुध्दा एकोडी येथे पोहचून जयचंद बिसेन यांची समजूत घालून पाणीटाकीवरुन खाली उतरण्याची विनंती केली. तसेच त्यांनी केलेल्या तक्रारीची गुरुवारपासून (दि.२५) चौकशी सुरु करण्याचे आश्वासन दिले. पण जोपर्यंत जिल्हाधिकारी आणि मुख्यकार्यकारी अधिकारी घटनास्थळावर येत नाही तोपर्यंत पाणीटाकीवरुन खाली उतरणार नाही अशी भुमिका जयचंद बिसेन याने घेतली असल्याने उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुध्दा अडचण झाली आहे.
विशेष म्हणजे जयचंद बिसेन यांनी महिनाभरापुर्वीच जि.प.व पं.स.च्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन एकोडी ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध कामातील घोळाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. अन्यथा पाणीटाकीवरुन उडी मारण्याचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाने याची दखल घेत न घेतल्याने जयचंद बिसेन यांनी बुधवारी सकाळी ७:३० वाजता गावातील पाणीटाकीवर चढून वीरुगीरी आंदोलन सुरु केले. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच एकच गोंधळ उडाला. गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली असून प्रशासनाचे अधिकार बिसेन यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते.