तिरोडा : येथील उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारपासून तब्बल दीड महिन्यानंतर बाह्यरुग्ण तपासणी विभाग सुरू करण्यात आला. गुरुवारी पहिल्याच दिवशी ६० रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले.
आ. विजय रहांगडाले यांनी गुरुवारी (दि. २०) तिरोडा तालुका पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाच्या उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालयाचा आढावा घेतला व इतर रुग्णसेवा सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे येथील सर्व सेवा पूर्ववत सुरू करण्यात आल्या.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांनी सांगितले की येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये ३७० कोरोनाबाधित रुग्ण भरती करण्यात आले. त्यांच्यावर यशस्वी उपचार करून सुटी देण्यात आली. तसेच आता रुग्णालयातील सर्वच आरोग्य सेवा पूर्ववत सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार रहांगडाले यांनी, कोविड केंद्रात अत्यल्प रुग्ण असल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे योग्य नियोजन करण्यास सांगितले. गरोदर महिलांची तपासणी, प्रसूती, सीझर, रुग्णवाहिका आदी सर्व सेवासुविधा गुरुवारपासून नियमित सुरू राहतील, असे सांगितले.