शिक्षकांना मार्गदर्शन : श्रीराम चव्हाण यांचे प्रतिपादनमोहाडी : परीक्षा केंद्रावर भेट देणाऱ्या भरारी पथकांना सन्मानाची वागणूक दिली जावी. काळजीपूर्वक परीक्षेचे संचालन करा, अडचणी येणार नाहीत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा. जिल्ह्यात एकही उपद्रवी परीक्षा केंद्र नाही. तरीही कोणत्याही भानगडीविना व निकोप वातावरणात परीक्षा घ्या, असे प्रतिपादन नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे सहाय्यक सचिव श्रीराम चव्हाण यांनी केले.दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरु होत आहे. परीक्षेचे संचालन करताना कोणत्या बाबी प्रकर्षाने लक्षात घ्याव्या. यासाठी परीक्षा केंद्रसंचालक व अतिरिक्त परीक्षा केंद्र संचालकांची सभा लाल बहादूर शास्त्री विद्यालय भंडारा येथे घेण्यात आली. सभेला मार्गदर्शक म्हणून म.रा. माध्यमिक व उच्च माध्मिक नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे सहाय्यक सचिव श्रीराम चव्हाण, प्राचार्य यांची उपस्थिती होती. विभागात दहावीचे ६६७ परीक्षा केंद्र आहेत. त्यापैकी भंडारा जिल्ह्यात ८७ परीक्षा केंद्र आहेत. ८७ परीक्षा केंद्रावर २२ हजार ३४० विद्यार्थी परीक्षेला बसली आहेत. भंडारा जिल्ह्यात केवळ १७ नंबरचे फॉर्म भरलेले परीक्षार्थी ५९ आहेत. नऊ कस्टडीतून दहावीच्या परीक्षेचे पेपर वितरित केले जाणार आहेत. जिल्ह्यातील चार शाळेचे सीसीटीव्हीच्या देखरेखीत परीक्षा घेतली जाणार आहे. या चारही शाळांकडून मंडळ माहिती घेणार आहे. शाळांमध्ये अता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.पेपरचे पॉकीट फोडण्याचा फक्त मान अतिरिक्त केंद्रसंचालक, केंद्र संचालक यांनाच दिला गेला आहे. धोका टाळण्यासाठी विषय, दिनांक, वेळ बघूनच पेपरचे पॉकीट फोडले जावे. प्रश्नपत्रिका दहा मिनिटे अगोदर विद्यार्थ्यांच्या हातात पडतील याची खबरदारी घ्या. परीक्षा संचालनाबाबत स्वत:चे सुक्ष्म नियोजन परीक्षा संचालकांनी करावे. आता केंद्र संचालकांना परीक्षेचे मानधन त्यांच्या बँक खात्यावर थेट जमा करण्यात येणार आहेत. पुढच्या वर्षीपासून मानधनात वाढ होण्याची शक्यता असल्याची माहितीही देण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)
निकोप वातावरणात परीक्षा व्हाव्यात
By admin | Published: February 25, 2016 1:38 AM