नगरसेवकांचा धनादेश :पोलीस कारवाईकडे जनतेचे लक्ष लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : आजघडीला स्थानिक नगरपंचायत खास चर्चेत गाजत आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नगराध्यक्षावर स्वकीयांसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता. नगर पंचायतच्या स्वकीय पक्षाच्या नगरसेवकांनी मारण्याचा प्रयत्न केला असला तरी मात्र काही विरोधी बाकावरील नगरसेवकांनी नगराध्यक्षांना अविश्वास प्रस्तावाच्या दिवशी तारल्याने काँग्रेस पक्षाची सध्या नामुष्की टळली. तर दुसऱ्या प्रकरणात एका स्वीकृत सदस्याने राजकीय सिंहासन काबीज करण्यासाठी व इतर आर्थिक व्यवहारासंबंधाने नगरपंचायतच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्यास कोरा धनादेश दिला. तो धनादेश विड्रॉल न होता अनादरीत झाल्याचे प्रकरण चांगलेच गाजत असल्याचे नगरात बोलल्या जात आहे. सध्या त्या धनादेशाची शहरामध्ये खमंग चर्चा सुरू आहे,येथील नगर पंचायतमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून जाण्यासाठी अनेकांनी साम, दाम व दंड नितीचा वापर करुन शर्थीचे प्रयत्न केले. नगर पंचायतच्या विरोधी गटामधून काही तडजोडीवर नगरातील एका खास उद्योगपतीला स्वीकृत सदस्य म्हणून नगरपंचायतवर घेण्यात आले अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यावेळी एका राजकीय पक्षाच्या तालुका प्रमुखांनी महत्त्वाची भूमिका निभावली असल्याचे एका पक्ष कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. तालुका पक्ष प्रमुखांच्या निर्णयाशी जाम नाराज होवून नगर पंचायतच्या एका जबाबदार नगरसेवकांनी त्याच वेळी त्या स्वीकृत सदस्याच्या नेमणुकीला आक्षेप घेवून संबंधितांकडे आक्षेप नोंदविले होते अशी आज नगरामध्ये चर्चा केली जाते. अलीकडेच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्या स्वीकृत सदस्याला मतपत्रिकेवरुन बटन दाबण्याची चांगलीच संधी मिळाली. नगर पंचायतमध्ये प्रवेशाच्यावेळी झालेल्या वाटाघाटीची तरतूद न झाल्याने नगरसेवकांमध्ये हेवेदावे सुरू झाल्याचे चित्र नगरात पाहायला मिळत आहे. एका स्वीकृत सदस्यांनी काही दिवसांपूर्वी जबाबदार नगरसेवकास दिलेला धनादेश त्यांनी बँकेत जमा केला. परंतु तो धनादेश वटलाच नही व त्याचा अनादर झाला. नगरपंचायतमधील ‘चेक बाऊंसची’ चर्चा मोठ्या चविष्टपणे पूर्ण शहर भर केली जात आहे. तो धनादेश कोणत्या व्यवहाराचा होता याची उकल केली जात आहे.धनादेश अनादर प्रकरणी एका नगरसेवकांनी पोलिसांकडे तक्रार केल्याचे समजते. वाटाघाटी सुरू असल्याच्या चर्चेने प्रकरण चविष्ट बनत आहे. धनादेशाचा व्यवहार आज नगरामध्ये एक चर्चेचा विषय ठरत आहे. पोलीस कारवाईकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
‘धनादेश अनादर’ व्यवहाराची खमंग चर्चा
By admin | Published: May 09, 2017 12:55 AM