परसवाडा : तिरोडा तालुक्यातील बोरा येथील अनेक गरीब गरजवंतांनी घरकुलासाठी अनेकदा ग्रामपंचायतीकडे अर्ज केला. परंतु प्रत्येकवेळी टाळाटाळ करण्यात येते. यात अनेक गरजवंतांना घरकुलाच्या यादीतून वगळल्याने संताप व्यक्त होत आहे. घरकुलाच्या यादीत नाव नसल्याने नव्याने तयार करण्यात आलेल्या ड यादीत तरी नावे समाविष्ट करण्यात यावीत, अशी मागणी कैवला गोविंदसिंह अटरे, फिरोज शेख यांनी ग्रामपंचायतकडे केली आहे.
गोरगरिबांचे घरकुलाचे स्वप्न साकारण्यासाठी शासनातर्फे विविध घरकूल योजना राबविण्यात येत आहे. मात्र शासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे अनेक पात्र लाभार्थी घरकूल योजनेपासून वंचित राहत आहेत. असाच प्रकार तिरोडा तालुक्यातील बोरा येथे उघडकीस आला आहे.
पात्र लाभार्थ्यांना डावलून एकाच कुटुंबातील दोन-तीन जणांचा समावेश करण्यात आला. ज्यांचे घर पक्के असूनही त्या घरात राहणाऱ्यांना घरकूल योजना मंजूर करण्यात आली आहे. मात्र कच्च्या, मोडकळीस आलेल्या आणि ताडपत्री टाकून झोपडीत राहणाऱ्या गरजू लाभार्थ्यांना यात डावलण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे मंजूर करण्यात आलेल्या घरकूल यादीची चौकशी करून योग्य लाभार्थ्यांना वंचित ठेवणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी गरजवंत लाभार्थ्यांनी केली आहे.