कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरात निघणाऱ्या ओल्या कचऱ्याचे निर्मुलन करता यावे यासाठी नगर परिषदेने या कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मितीचा प्रयोग केला आहे. यासाठी नगर परिषदेने शहरात पाच जागांवर टँक बनविले असून तेथे ओल्या कचऱ्यावर प्रक्रीया करून गांडूळ खत निर्मिती केली जात आहे. विशेष म्हणजे, नगर परिषदेने अशाप्रकारे तयार केलेल्या गांडूळ खताच्या नमुन्यांना प्रयोगशाळेने पॉजिटिव्ह रिपोर्ट दिला आहे.शासन सध्या स्वच्छतेवर जास्त भर देत असून स्वच्छ भारत अभियान आता एक चळवळ म्हणून राबविले जात आहे. शहर स्वच्छ असल्यास वातावरण शुद्ध राहून नागरिकांचे आरोग्यही चांगले राहणार हे सत्य आहे.यामुळे शासनाकडून स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता सर्वेक्षणाच्या माध्यमातून शहरांची रँकींगही केली जात आहे. एकंदर शहर स्वच्छ रहावे यासाठी शहरातील कचºयाच्या निर्मुलनावर भर दिला जात आहे.यात मोठ्या शहरांकडे तेवढ्या प्रमाणात यंत्रणा व सोयी असल्याने त्यांच्याकडून कचरा निर्मुलन सहज केले जाते. मात्र येथील नगर परिषदेकडे त्याप्रमाणात यंत्रणा व सोयी नाहीत.परिणामी शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावणे जिकरीचे काम झाले आहे. यातूनच शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारही दिसून येतात. यात सर्वात जास्त धोका ओल्या कचऱ्यापासून असतो. ओल्या कचऱ्यापासून एकतर दुर्गंध पसरते शिवाय त्यातून डास व किड्यांची उत्पत्ती होऊन आजारांचा धोका बळावतो.यावर तोडगा म्हणून नगर परिषदेने ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मिताचा प्रयोग हाती घेतला. डिसेंबर २०१७ पासून नगर परिषदेने या प्रयोगांतर्गत शहरात पाच ठिकाणी टँक तयार केले असून त्यात ओल्या कचऱ्यावर प्रक्रीया केली जात आहे.अशाप्रकारे तयार करण्यात आलेल्या गांडूळ खताचे नमुने नगर परिषदेने अमरावती येथे प्रयोगशाळेत पाठविले होते. प्रयोगशाळेने त्या नमुन्यांना पॉजिटिव्ह रिपोर्ट दिला आहे हे विशेष.बागेत केला जातो गांडूळ खताचा वापरनगर परिषदेने ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मितीसाठी नगर परिषद कार्यालयाच्या मागील भागात, अग्निशमन विभाग, इंजिनशेड शाळा, मालवीय शाळा व सुभाष बागेत टँक बनविले आहेत. येथे ओल्या कचऱ्यावर प्रक्रीया करून गांडूळ खत निर्मिती केली जात आहे. भविष्यात हा प्रयोग मोठ्या प्रमाणावर केला जाणार असून त्यातून नगर परिषदेला आर्थिक उत्पन्नही होणार आहे. सध्या नगर परिषदेने तयार केलेल्या खताचा वापर सुभाष बागेत केला जात आहे.
गांडूळ खत निर्मितीतून ओल्या कचऱ्याचे निर्मुलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 9:25 PM
शहरात निघणाऱ्या ओल्या कचऱ्याचे निर्मुलन करता यावे यासाठी नगर परिषदेने या कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मितीचा प्रयोग केला आहे. यासाठी नगर परिषदेने शहरात पाच जागांवर टँक बनविले असून तेथे ओल्या कचऱ्यावर प्रक्रीया करून गांडूळ खत निर्मिती केली जात आहे.
ठळक मुद्देनगर परिषदेचा यशस्वी प्रयोग : प्रयोगशाळेने दिला पॉजिटिव्ह रिपोर्ट