लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एकेकाळी गोंदिया जिल्ह्याची जीवनदायिनी पांगोली नदी आजघडीला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मात्र या नदीचे अस्तीत्व संपण्याच्या मार्गावर असूनही जिल्हा प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधी देखील या नदीच्या विकासासाठी गंभीर नसल्याने ही मोठी शोकांतिका आहे.पांगोली नदीला तिचे गतकालीन वैभव प्राप्त व्हावे, नदीचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी सन २०१४ पासून गोंदिया शहरातील समाजोन्नती बहुउद्देशिय ग्रामीण व शहरी विकास संस्था गोंदिया या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संस्थाध्यक्ष जैयवंता उके, संस्था सचिव तीर्थराज उके, कोषाध्यक्ष तथा संकल्पना निदेशक डिम्पल उके, संस्थेचे सदस्य उमेश मेश्राम, टेकचंद लाडे, मुकेश उके, प्रफुल उके, चंद्रशेखर लाडे, शेतकरी रघुनाथ मेश्राम, माजी पं.स.सदस्य चंद्रशेखर वाढवे, संदेश भालाधरे, गोपाल बनकर, मिठेश्वर नागरीकर, ओमकार मदनकर, भोजू राऊत, राजेश कटरे, आशिष उईके, प्रल्हाद बनोठे, दिनेश फरकुंडे आदी शेतकरी व नागरिक प्रयत्नशील आहेत. निवेदनांच्या माध्यमातून शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींचे यां विषयाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र कुणालाही या महत्त्वाच्या विषयाचे गांभिर्य अद्याप कळले नाही. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, केंद्र शासनाची महत्वाकांक्षी अटल भुजल योजना (अटल जल) योजना, केंद्र शासनाच्या विशेष पॅकेजच्या माध्यमातून, नागपूरच्या नाग नदी प्रमाणे त्याच धर्तीवर जपान देशासारख्या विदेशी सहकार्याच्या माध्यमातून तसेच अन्य केंद्रिय एजन्सीच्या स्त्रोताच्या माध्यमातून या नदीचा विकास शासनाने करावा, अशी वेळीवेळी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. नदी विकासासाठी एक अंदाजित नियोजन विकास आराखडा ही सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व प्रसार माध्यमांनी हा विषय उचलून धरला. मात्र शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींना मात्र पांगोलीची दयनीय होत चाललेली अवस्था अजूनही कळली नाही. नुकतेच संस्थेच्यावतीने १७ जून रोजी रोजी ईमेल द्वारे देशातील लोप पावणाऱ्या नद्यांच्या पुनर्जिवन व विकासासाठी कार्यरत राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान, नागपूर (निरी) या केंद्रस्तरीय संस्थेकडे निवेदन पाठवून जिल्ह्याची जीवनदायीनीला वाचवून तिचा सर्वांगिण विकास करण्यासाठी प्रयत्न करावे, तिच्या विकासासाठी कृती कार्यक्र म तयार करून नियोजन विकास आराखडा तयार करावा व त्याची त्वरीत अंमलबजावणी करावी, या मागणीचे निवेदन पाठविण्यात आले आहे.कामे झालीत तर असा होईल फायदापांगोली नदीचा विकास झाल्यास जिल्ह्याची खालावलेली भूजल पातळी वाढेल, नदीपात्रात बारमाही पाणी राहील, शेतकऱ्यांना बारमाही पाणी शेतीसाठी उपलब्ध होऊ शकेल, शेतकरी पारंपारिक पिकांसह नगदी पिके घेऊ शकतील, बागायती व फळ, भाजीपाला शेती करू शकतील, जिल्ह्याची जलसिंचन क्षमता वाढेल, नदीकाठावरील परीसर पर्यावरण समृध्द होईल, भविष्यात या नदी पात्रात मासेमारी व बोटींगच्या संधी ही निर्माण होऊ शकतात. जनावरेही या नदीचा पुर्वीप्रमाणे पाणी पिऊ शकतात.शेतकºयांना गावातच रोजगार मिळेल, शेतकरी शेती न विकता अधिक समृद्ध व आधुनिक शेतीच्या दिशेने मार्गक्रमण करील.जिल्ह्याच्या शेतीला गतवैभव प्राप्त होईल,शेतकरी सुखी होईल.
पांगोली नदीचे अस्तित्व आले धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 5:00 AM