अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील बोडगाव सुरबन येथील श्रुंगारबांध तलावाच्या पाण्यात दोन विदेशी पक्षी गुरुवारी मृतावस्थेत आढळले. या पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यू, विषयुक्त पाणी की अन्य कारणांमुळे झाला हा चर्चेचा विषय आहे. या पक्ष्यांच्या मृत्यूबद्दल अनभिज्ञता आहे. नेमका मृत्यू कशामुळे झाला याची शहानिशा होणे गरजेचे आहे.पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे तर झाला नाही ना? अशी शक्यता वर्तवली जात आहे.
गोंदिया जिल्ह्याची तलावांचा जिल्हा अशी सर्वदूर ओळख आहे. येथील तलावात दरवर्षी साधारणतः ऑक्टोबर महिन्यात विदेशी पक्ष्यांचे आगमन होत असते. जास्त तापमान सहन होत नसल्याने हे पक्षी हिवाळा संपला की फेब्रुवारी महिन्यात परत जातात. यावर्षी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित पक्षी आले. परतीचा काळ संपूनही अद्याप ते परत गेले नसल्याने पक्षीप्रेमींमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अर्जुनी मोरगाव येथील पक्षीमित्र डॉ. प्रा. गोपाल पालिवाल, डॉ. प्रा.शरद मेश्राम, प्रा.अजय राऊत यांनी रविवारी श्रुंगारबांध तलावाला भेट दिली. यंदाच्या हिवाळा ऋतूतील नियमित भेटीत जेवढे विदेशी पक्षी आढळून आले नाही त्यापेक्षा अधिक प्रमाणात त्यांना रविवारी या तलावावर विदेशी पक्षी आढळून आले. एवढ्या मोठ्या संख्येत पक्षी बघून ते थक्क झाले. या तलावावर जणू पक्ष्यांची शाळाच भरली होती हे दृश्य बघून त्यांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. मात्र तलावात दोन मोठे ग्रे लेग गुज (कलहंस) मृतावस्थेत पाण्यावर तरंगताना आढळले. हे दृश्य बघून ते गहिवरले. एकीकडे त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू तर दुसरीकडे दुखाश्रूचे भाव स्पष्ट दिसून येत होते.
.....
नेमका मृत्यू कशामुळे ?
दोन स्थलांतरित पक्ष्यांचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी व तेवढीच खेदजनक बाब आहे. दिवसेंदिवस वाढत्या अतिक्रमणांमुळे तलावांचे क्षेत्र कमी होत चालले आहे. तलावांच्या काठावर शेती होत आहे. शेतात पिकांवर कीटकनाशकांची फवारणी केली जाते. तेच पाणी तलावात येते किंवा शेतकरी कीटकनाशकाचा रिकामा झालेला डब्बा तलावाच्या दिशेने फेकून देतात. यातील विषारी द्रव्य तलावाच्या पाण्यात मिसळते व पाणी दूषित होतो. विषयुक्त पाणी प्राशन केल्याने पक्ष्यांचा मृत्यू संभवतो. असे अनेक प्रकार घडत असतात जे दृष्टीस येत नाहीत.
.....
तलावावर पक्ष्यांची शिकार
या तलावावर पक्ष्यांची शिकार सुद्धा होत असल्याचे बोलल्या जाते. पक्ष्यांचा बर्ड फ्ल्यूमुळे मृत्यू होण्याची शक्यता कमी आहे. बर्ड फ्ल्यूमुळे मृत्यू झाला असता तर याची बाधा इतर पक्ष्यांवर झाली असती व अधिक प्रमाणात पक्ष्यांचा मृत्यू झाला असता. अशीच एक दुर्दैवी घटना २९ जुलै २०११ रोजी घडली होती. या तलावात एक सारस पक्ष्यांची जोडी होती. या जोडीमुळेच श्रुंगारबांध तलाव नावारूपाला आला होता. अत्यंत दुर्मिळ असलेले सारस पक्ष्यांचे जोडपे कीटकनाशक औषधीयुक्त धानबिया खाल्ल्याने मृत्युमुखी पडले होते.