लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोरेगाव नगर पंचायतकडे शिल्लक असलेल्या तीन कोटींच्या अखर्चित निधीला खर्च करण्यासाठी नगर विकास विभागाने मुदत वाढ दिली आहे. शिल्लक निधी खर्च करण्यास मुदतवाढ मिळावी यासाठी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले.नागरी सुविधा योजनेंतर्गत गोरेगाव शहरात रस्ते, नाली व समाजभवन आदी नागरी सुविधांसाठी शासनाकडून तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (रोहयो) वेळेवर अंदाजपत्रक तयार करून तांत्रीक मंजुरी न मिळाल्याने हा निधी वेळेत खर्च झाला नाही. शासनाकडून ३१ मार्च २०१७ पर्यंत निधी खर्च करण्याचे आदेश होते. मात्र मुदत निघून गेल्याने तीन कोटी रुपयांचा निधी नगर पंचायतकडे अखर्चित निधी म्हणून शिल्लक होता.नगराध्यक्ष सीमा कटरे व कॉंग्रेसच्या नगर पंचायत सदस्यांनी आमदार अग्रवाल यांची भेट घेऊन निधी खर्च करण्यासाठी शासनाकडून मुदत वाढवून देण्याची मागणी केली. आमदार अग्रवाल यांनी १ आॅगस्ट रोजी नगर पंचायतकडून सविस्तर प्रस्ताव मागवून मुख्यमंत्री व नगर विकास मंत्रालयाचे प्रभारी मंत्री फडणवीस यांची भेट घेऊन निधी खर्च करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली. आमदार अग्रवाल यांच्या मागणीवरून मुख्यमंत्र्यांनी मुदत वाढवून देण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले होते. परिणामी मंत्रालयीन स्तरावर कागदोपत्री पाठपुरावा करून ६ नोव्हेंबर रोजी नगर विकास विभागाने तीन कोटींचा निधी खर्च करण्यासाठी मुदतवाढ देत असल्याचे पत्र गोरेगाव नगर पंचायतला दिले. विशेष म्हणजे या आदेशाची प्रत आमदार अग्रवाल यांनी गोरेगाव नगर पंचायत पदाधिकाºयांच्या सुपूर्द केली आहे.निधी खर्च करण्यासाठी मुदत वाढवून दिल्याबद्दल नगराध्यक्ष कटरे, सभापती रवींद्र चन्ने, राजू टेंभूर्णीकर, मलेशाम येरोला, आशिष बारेवार, पक्षनेता मधुबाला साखरे, हिरणबाई झंझाड, निमावती धपाडे, श्यामली जायस्वाल, चंद्ररेखा कांबळे, डेमेंद्र रहांगडाले, जगदीश येरोला आदिंनी आमदार अग्रवाल यांचे आभार मानले. विशेष म्हणजे, निधीची मुदतवाढ करवून देण्याचे विधान परिषद सदस्य लाटण्याचा प्रयत्न करीत होते. यावर मात्र काहीही प्रयत्न न करता श्रेय लाटण्याचे काम उच्च पदांवर बसलेल्यांनी करू नये, अशी टिका कॉंग्रेस कमिटीच्या पदाधिकाºयांनी केली.
शिल्लक निधी खर्च करण्यास मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 10:01 PM
गोरेगाव नगर पंचायतकडे शिल्लक असलेल्या तीन कोटींच्या अखर्चित निधीला खर्च करण्यासाठी नगर विकास विभागाने मुदत वाढ दिली आहे.
ठळक मुद्देनगर विकास विभागाचे आदेश : आमदार अग्रवाल यांचा पाठपुरावा