केशोरी : परिसरात रब्बी धान पीकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती. आदिवासी विकास महामंडळाने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना सात-बारा ऑनलाईन करण्याची मुदत १५ मेपर्यंत दिली होती. कोरोनाच्या संकटामुळे शेतकऱ्यांना सातबारा ऑनलाईन करणे शक्य झाले नाही. त्यामुळे सातबारा ऑनलाईन करण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी योगेश नाकाडे, श्रीकांत घाटबांधे, दिनेश पाटील रहांगडाले यांनी केली आहे.
या वर्षीच्या रब्बी हंगामातील उन्हाळी धान पीकाचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या हातात पडले आहे. आधारभूत धान खरेदी केंद्रावर एकाच वेळेस धानविक्री करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होणार नाही म्हणून शेतकऱ्यांना सातबारा ऑनलाईन नोंदणी करुन टोकण प्राप्त करुन घेण्याची पद्धत आदिवासी विकास महामंडळाने कार्यान्वित केली आहे. ऑनलाईन करण्याची मुदत १५ मेपर्यंत देण्यात आली होती. दिलेल्या मुदतीच्या आत कोरोनाचा प्रकोप वाढलेला होता. त्यामुळे तलाठी साजे बंद होते. तसेच खाजगी इंटरनेट कॅफेसुद्धा बंद होते. काही दिवसापर्यंत सदर साईड ओपन होण्यास अडथळा निर्माण झाला होता.
त्यामुळे जवळपास ५० टक्के शेतकरी सातबारा ऑनलाईन करण्याच्या प्रक्रियेपासून वंचित राहिले आहेत. सात-बारा ऑनलाईन करण्याची मुदत वाढ १५ जूनपर्यंत वाढविण्याच्या मागणीसह या परिसरातील गोठणगाव, केशोरी, इळदा, या केंद्रातील साठवून ठेवण्यात आलेले खरीप हंगामातील धान्याची तात्काळ उचल करुन ही तिन्ही आधारभूत धान खरेदी सुरु करण्याची मागणी योगेश पाटील नाकाडे, श्रीकांत घाटबांधे, दिनेश पाटील रहांगडाले यांनी केली आहे.