मुरदोली : कोविड संबंधित कर्तव्य बजावत असताना संक्रमित होऊन मृत्यू पावलेल्या पोलीस पाटलांच्या वारसांना ५० लाख रुपयांचा विमा संरक्षणाची मुभा डिसेंबर २०२० पर्यंत लागू करण्यात आलेली होती. तिची मुदत पुन्हा एक वर्षांनी वाढविण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कामगार पोलीस पाटील संघाच्यावतीने राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खा. प्रफुल्ल पटेल, आ. मनोहर चंद्रिकापुरे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
पोलीस पाटील मानसेवी कर्मचारी म्हणून गाव पातळीवर कार्यरत आहे. कोरोना सार्वत्रिक साथीमध्ये सर्वेक्षण, शोध, मार्ग काढणे, प्रतिबंध व मदत कार्ये संबंधाने कर्तव्य बजावीत आहे. संघटनेच्या पाठपुराव्यानंतर मागील वर्षी सर्व कोरोना फ्रंटलाईन योद्धांसह पोलीस पाटलांना शासन निर्णयानुसार ५० लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात विमा कवच मंजूर करण्यात आले होते. त्याची मुदत सप्टेंबर २०२० पर्यंत होती. त्यानंतर कोरोना संक्रमन सुरूच असल्याने शासनाने या आदेशाला मुदतवाढ देऊन त्याची मर्यादा ३१ डिसेंबर २०२० पर्यंत केलेली होती. ती मुदत आता संपली असून यावर्षी कोरोना संसर्गाचे प्रमाण दुपटीने वाढलेले आहे व सर्व फ्रंट लाईन वर्कर जीव धोक्यात घालून कार्य करीत आहेत. त्यामुळे पोलीस पाटलांना विमा संरक्षणाची मुदत डिसेंबर २०२१ पर्यंत देण्यात यावी, अशी संघटनेची मागणी आहे.
.......
पोलीस पाटलांची रिक्त पदे भरा
मागील ३ वर्षांपासून नवीन पोलीस पाटील भरती घेण्यात आलेली नाही. त्यामुळे ४० टक्के पदे रिक्त आहेत. एकच पोलीस पाटील अनेक गावचा पदभार सांभाळत आहेत. सध्या नवीन भरती होण्याची शक्यता नाही. म्हणून पोलीस पाटलांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ करून त्यांना सेवानिवृत्तीची योजना लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर, गोंदिया जिल्हाध्यक्ष दिलीप मेश्राम, सुधाकर साठवणे भंडारा, शरद ब्राह्मणकर गडचिरोली, श्रीराम झिंगरे, नंद ठाकरे, राजेश बन्सोड, सुरेश बोरकर, मनोहर सोनवाने यांनी केली आहे.