गोंदिया : शासनाची आयुष्यमान भारत योजना ही सर्वसामान्यांसाठी लाभाची योजना आहे. सामान्य गरजू रूग्णांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी टीमने प्रयत्न केले पाहिजे. यासाठी आयुष्यमान भारत योजनेची व्याप्ती वाढवा असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरिश मोहबे यांनी केले.
प्रधानमंत्री आयुष्यमान आरोग्य विमा योजनेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त येथील केटीएस जिल्हा रुग्णालयात गुरूवारी (दि.२३) आयोजित जनजागृती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उदघाटन येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. अपूर्वा पावडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले. पाहुणे म्हणून निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख नंदकुमार जायस्वाल, आयुष्यमान भारतच्या जिल्हा नोडल अधिकारी डॉ. जयंती पटले, जिल्हा समन्वयक मनोज कुमार, कॅम्प प्रचारक नागपुरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. पावडे यांनी, केटीएस जिल्हा रुग्णालयातून जास्तीत जास्त शल्य चिकित्सा करण्याचा प्रयत्न टीमव्दारे करण्यात यावा. जेणेकरून रुग्णांना खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार करण्यासाठी कर्ज काढावे लागणार नाही असे सांगितले. डॉ. हुबेकर यांनी, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयातून सुद्धा आयुष्यमान भारत विमा योजने अंतर्गत नियमित रोगनिदान व मोफत शस्त्रक्रिया शिबिर आयुष्यमान टीमने आयोजित करावे. जेणेकरून ग्रामीण भागातील जनतेला देखील या योजनेचा लाभ मिळेल असे सांगितले. याप्रसंगी डॉ. पटले यांनी मागील ३ वर्षांतील आयुष्यमान भारत योजनेचा वृत्तांत सादर केला. संचालन करून आभार टेंभुर्णे यांनी मानले.
--------------------------------
लाभार्थ्यांना केले गोल्डन कार्डचे वितरण
प्रधानमंत्री आयुष्यमान विमा योजनेच्या तिसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमात लाभार्थी बीपीएल कुटुंब प्रमुखाला प्रधानमंत्री आयुषमान योजनेचे गोल्डन कार्ड डॉ. पावडे व डॉ. मोहबे यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.