केशोरी : पीक विमा अर्ज भरण्याची मुदत शासनाने १५ जुलैपर्यंत दिली होती. परंतु ऑनलाईन अर्ज करताना लिंक कनेक्टीव्हीटी मिळत नसल्यामुळे या परिसरातील अनेक शेतकरी पीक विमा अर्ज भरण्यापासून वंचित राहिले आहेत. दिलेल्या मुदतीच्या आत पीक विमा अर्ज भरु शकले नाहीत. त्यामुळे पीक विमा अर्ज भरण्याची मुदतवाढ करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पावसाअभावी शेतीची रोवणी खोळंबली असली तरीही ज्या शेतकऱ्यांकडे स्वत:ची सिंचन व्यवस्था आहे त्यांची रोवणी सुरु आहे. शेतकरी रोवणीच्या कामात गुंतून असल्यामुळे शासनाने पीक विमा अर्ज करण्याची मुदत १५ जुलै पर्यंत दिली होती. त्या मुदतीच्या आत पीक विमा अर्ज ऑनलाईन प्रणालीमध्ये लिंक मिळत नसल्यामुळे अर्ज करणे शक्य झाले नाही. पीक विमा अर्जासोबत सातबारा, ८ (अ), बॅंक पासबूक आणि आधारकार्ड अपलोड करावयाचे होते. परंतु इंटरनेट कनेक्टिव्हीटी बरोबर नसल्यामुळे पीक विमा अर्ज भरण्यापासून शेतकरी वंचित राहिले आहेत. तांत्रिक अडचण लक्षात घेवून शासनाने पीक विमा अर्ज करण्याची मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांसह योगेश नाकाडे पाटील यांनी केली आहे.