गोंदिया : यंदा जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाचे खरीप तसेच रब्बीतील धान खरेदीचे नियोजन फसल्याने शेतकऱ्यांची चांगलीच अडचण झाली आहे. आधी गोदाम आणि आता बारदान्याअभावी खरेदी खोळंबल्या. रब्बीतील धान खरेदीला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याची वेळ शासनावर आली. आता २२ जुलैपर्यंत दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे.
धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी उत्पादन घेतलेले रब्बी हंगामातील धान, अद्यापही ऑनलाइनच्या तांत्रिक बिघाडामुळे, तर कधी बारदान्याअभावी केंद्रावर धान खरेदी होण्यास विलंब झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मुदतीच्या आत धान खरेदी होणार की नाही, अशी संभ्रमावस्था झाली होती. यंदा रब्बीतील धान खरेदीत सुरुवातीपासून विविध अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे खा. प्रफुल्ल पटेल, आ. मनोहर चंद्रिकापुरे, सहषराम कोरोटे आणि माजी आ. राजेंद्र जैन यांनी रब्बीतील धान खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. खा. प्रफुल्ल पटेल यांनी अन्नपुरवठामंत्री छगन भुजबळ व जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या महाव्यवस्थापकांशी चर्चा केली होती. त्यानंतर शासनाने शुक्रवारी (दि.१६) रब्बी हंगामातील धान खरेदीला २२ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
.............
२२ जुलैपर्यंत पूर्ण खरेदी न झाल्यास
पुन्हा मुदतवाढ
रब्बी हंगामातील धान खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी यासाठी आ. परिणय फुके यांनी अन्नपुरवठामंत्री व सहकारमंत्र्यांना भेटून ३१ जुलैपर्यंत खरेदीला मुदतवाढ वाढून देण्याची मागणी केली होती. आ. फुके यांच्या पत्राची दखल घेत राज्य शासनाने १५ जुलैपासून आणखी ७ दिवस म्हणजे २२ जुलैपर्यंत धान खरेदी करण्यास मुदतवाढ करण्याचा निर्णय घेतला. २२ जुलैपर्यंत १०० टक्के धान खरेदी न झाल्यास परत मुदतवाढ देण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आ. परिणय फुके यांनी सांगितले.