सर्व रस्ते पडले बंद : हाजलाफॉलजवळ सर्वत्र पसरले पाणीच पाणीसालेकसा : तालुक्यात ११ सप्टेंबरला पहाटे ४ वाजतापासून धो-धो सुरू झालेल्या सहा तासाच्या पावसाने सालेकसा तालुक्याला जलमय केले. त्यामुळे राज्य महामार्ग-२४९ (आमगाव-सालेकसा-दर्रेकसा) दिवसभर बंद राहिला. तसेच इतर सर्व रस्ते अवरूध्द झाल्याने तालुका मुख्यालयाचा संपर्क दिवसभर तुटून राहिला. परिणामी एसटी, काळी-पिवळी यांच्यासह चारचाकी व दुचाकी वाहने सालेकसा जाऊ शकली नाही. तसेच सालेकसात असलेली वाहने बाहेर जाऊ शकली नाही. रविवारचा दिवस असल्याने कार्यालयीन काम काजावर याचा जास्त फटका बसला नाही. परंतु बाजारपेठ व लोकांच्या दैनंदिन कामावर मोठा फटका बसलेला दिसून आला. तालुक्यातील लोकांना सर्व कामे शेवटी रद्द करावी लागली. सायंकाळपर्यंत सालेकसा-आमगाव मुख्य मार्गावर पुलावरून पाणी वाहने सुरूच होते. पहाटे सुरू झालेला पाऊस सकाळी ६ वाजतापर्यंत ११४ मिमी पर्जन्यमान पडल्याची नोंद महसूल विभागाने केली आहे. सहा वाजेनंतरही धो-धो करीत संततधार पडत राहिला. १० वाजेपर्यंत पावसाने लोकांना घराबाहेर निघणे कठिण केले होते. त्यामुळे सहा वाजेनंतर चार तास पडलेला पाऊस २०० मिमीच्या वर गेला असावा, असा अंदाज महसूल विभागाने वर्तविला आहे. या पावसामुळे तालुक्यात सर्व छोट्यामोठ्या नदी नाल्यांना महापूर आला आणि तालुक्यातील सर्व रस्ते बंद झाले. सालेकसा तालुका छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत असून छत्तीसगडच्या अतिवृष्टीचा मोठा फटकासुध्दा तालुक्याला बसताना दिसला. सकाळी सर्व रस्ते सुरू असतानाच आठ वाजेपासून सर्वत्र पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहने सुरू झाले. बघता बघता रोंढा नाल्यावर, सालेकसा-आमगाव मुख्य मार्गावर पुलावरून पाच ते सहा फूट पाणी वर वाहू लागले व मार्ग पूर्ण अवरूध्द झाला. तसेच छत्तीसगड राज्यातून तालुक्यात वाहत येणारे सर्व नाले पूरग्रस्त झाले. सालेकसा-दरेकसा बस मार्ग ठिकठिकाणी अवरूध्द झाला. यात धनसुवाबोरी नाला, नवाटोला नाला, जांभळी नाला, हाजराफाल नाला, धनेगाव नाला, दलदलकुही नाला यांना पूर आल्यामुळे पाचसहा ठिकाणी मार्ग अवरूध्द होऊन पुलावरून पाच फुट उंचीपर्यंत पाणी वाहत गेले. हाजराफाल येथे तीन नाल्यांचे पाणी एकत्र पडत असल्याने येथे हाजराफॉल पहाडानजीक सालेकसा-दरेकसा मार्गावर मोठे जलाशय निर्मित झाल्याचे दृश्य निर्माण झाले. येथील पुलावरून १० ते १२ फूट उंच पातळी गाठत पाणी वाहताना सर्वत्र पुराच दृश्य निर्माण झाली. दिवसभर सालेकसा आणि दरेकसा परिसरातील अनेक गावे संपर्काबाहेर होती. या गावांना रेल्वे मार्ग लाभल्यामुळे येथील लोकबाहेर जाऊ शकली. परंतु दरेकसा नजीक कोपालगढ नाल्याच्या पुरामुळे बोगद्याजवळ रेल्वे लाईनवरून पाणी वाहत होते. ही माहिती मिळताच सर्व गाड्या मधामधात थांबत पुढे जात होत्या. (तालुका प्रतिनिधी) ‘ते’ कुटुंबीय थोडक्यात बचावले ४बालाघाट येथील जैन कुटूंबीय खैरागड (छत्तीसगड) येथे आपल्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी जास्त असताना सालेकसा-दरेकसा मार्गावर जांभळी नाल्याला पुर आल्यामुळे पाण्याचे ढेल खाल्याने पुलावरून पाणी वाहू लागला होता. पुलाची उंची फारच कमी असून पाण्याची पातळी वाढली याचा अंदाज कार चालकाला लागला नाही व त्याचे कार पुलावरून नेताच कार मधातच धोक्यात येऊ लागली याचा अंदाज त्या ठिकाणी पुर बघायला गेलेले युवकांना लागला. व ते मदतीला धावले. कारमध्ये दोन पुरूष, दोन महिला आणि एक छोटा मुलगा होता युवकांनी सर्वांना सुखरुप बाहेर काढले पाण्यात घुसून कार बाहेर काढण्यात यशस्वी झाले. त्या युवकामध्ये विजय फुंडे, साई बंडीवार, शैलेश बहेकार, गणेश शेंडे, मिठाई मिश्रा यांचा समावेश होता. शेंडे यांनी मुलांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत केली.
अतिवृष्टीने सालेकसा जलमय
By admin | Published: September 13, 2016 12:44 AM