गोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे संपूर्ण रुग्णांमध्ये भीती आहे. नेत्र शस्त्रक्रिया करण्यासाठी ज्यांचा मोतीबिंदू पिकला आहे तेही कोरोनाच्या धास्तीमुळे शस्त्रक्रिया करायला पुढे येत नाही. किंवा कुणी शस्त्रक्रिया करायला आले तरी त्यांची शस्त्रक्रिया होत नाही. आजघडीला गोंदिया जिल्ह्यातील २ हजारांवर ज्येष्ठ नागरिकांच्या शस्त्रक्रिया न झाल्यामुळे त्यांच्यापुढे अंधार आहे.
गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येतात. कोरोना सुरू होण्यापूर्वी वर्षाकाठी ४ हजारांवर ज्येष्ठांच्या नेत्र शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. परंतु कोरोनामुळे ५० टक्क्यांपेक्षा कमी लोकांच्या शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. त्यातल्या त्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने नेत्र शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णांना ठेवण्यात येणारे वॉर्ड कोविड रुग्णांसाठी दिल्याने या नेत्र शस्त्रक्रिया सद्य:स्थितीत बंद आहेत. मागच्या वर्षी एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या वर्षात २,०८० नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात २५ बेडचे दोन कक्ष नेत्र शस्त्रक्रिया रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. परंतु कोविड रुग्णांसाठी ते वॉर्ड देण्यात आल्यामुळे गोरगरीब रुग्णांसमोर आता अंधार पसरला आहे. काही रुग्ण कोरोनाच्या भीतीमुळे स्वत:च रुग्णालयापर्यंत येत नाही. काही लोक नेत्र शस्त्रक्रिया करण्यासाठी आले तरी त्यांच्या शस्त्रक्रिया होत नाहीत.
.............
शासकीय रुग्णालयात कोरोनाआधी महिन्याला होणाऱ्या नेत्र शस्त्रक्रिया- ३५०
गेल्या वर्षात झालेल्या नेत्र शस्त्रक्रिया- २,०८०
..........................
कोट
मागच्या आर्थिक वर्षापर्यंत नेत्र शस्त्रक्रिया केल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लोक घाबरून नेत्र शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढे येत नाही. सद्य:स्थितीत शस्त्रक्रिया करणे बंद आहे. यासंदर्भात आम्ही आमच्या वरिष्ठांना पत्र दिले आहे; परंतु त्यांचे आदेश न मिळाल्यामुळे शस्त्रक्रिया करणे सध्यातरी बंद आहे.
-डॉ. राजेंद्र अग्रवाल, नेत्ररोगतज्ज्ञ
.........
अंधार कधी दूर होणार?
१) नेत्र शस्त्रक्रिया करण्यासाठी आधी कोरोनाची चाचणी केल्याचा अहवाल आणा तरच शिबिरात तुमचा नंबर लागेल असे सांगितले जाते. आरटीपीसीआर टेस्ट केल्यावर दहा- बारा दिवस त्याचा अहवाल येत नसल्यामुळे शिबिराची वेळ निघून जाते. त्यामुळे आमच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया होऊ शकली नाही.
बकाराम हुमे, आसोली
.......
२) कोरोनामुळे इतर सर्व आजारांकडे दुर्लक्ष करण्यात आले. आमच्यासारख्या ज्येष्ठांच्या डोळ्यांच्या समस्या खूप वाढत आहेत; परंतु कोरोनाच्या धास्तीमुळे आमच्या नेत्र शस्त्रक्रिया कुणी करायलाच तयार नाही. रुग्णालयात गेल्यावर फक्त वेळ दिली जाते.
- पारबता दिवाळे, किडंगीपार
.........
३) कोरोनामुळे नेत्र शस्त्रक्रियेकडे दुर्लक्ष करण्यात आले. डोळ्यांतील मोतीबिंदू पिकले असतानाही त्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांकडून वेळ देऊन टाळले जाते. कोरोनामुळे गर्दी करू नका, दूर व्हा, शिबिर होणार नाही असे सांगून फक्त ड्राप देऊन घरी पाठविण्यात येते.
- सरस्वता फाये, किडंगीपार