यापूर्वी मार्च २०२० मध्ये काढण्यात आलेले आरक्षण रद्द करण्यात आले असून मतदानानंतर ३० दिवसाचे आत आरक्षण प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया १५ जानेवारीला पार पाडण्यात येऊन १८ जानेवारीला मतमोजणीनंतर निवडून आलेल्या सदस्यांचे चेहरे आनंदाने फुलले आहे. ज्या पॅनलचे बहुमत सिध्द झाले आहे, त्या पॅनल प्रमुखासह सरपंचपदासाठी अनेक इच्छुक समोर आले आहेत. ग्रामपंचायत निवडणुका फार चुरशीच्या झाल्यात. त्यामध्ये काहींना खुशी तर काहींना गम अशी स्थिती दिसून आली. निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये ६० टक्के महिला असून यावेळी निवडून आलेल्या सदस्यांमधून आरक्षण तालिकेनुसार सरपंच निवडणे असल्याने अनेक पॅनल प्रमुखांसह इतर इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यापूर्वी मार्च महिन्यात जाहीर केलेल्या आरक्षणाप्रमाणे सरपंचपदाचे आरक्षण डोळ्यासमोर ठेवून काही पॅनल प्रमुखांनी ग्रामपंचायत निवडणूक लढविली. पॅनलचे बहुमत सिध्द झाले असले तरीही सरपंचपदाचे आरक्षण जाहीर नसल्याने किमान ३० जानेवारीपर्यंत सरपंचपदाच्या आरक्षणासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. हे निश्चित असून अनेक सरपंचपदाचे दावेदार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत हे मात्र निश्चित.
गावकऱ्यांच्या नजरा आता सरपंच आरक्षणाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 4:26 AM