गोंदिया : कोरोनाला आवर घालण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्यांवर जोर दिला जात आहे. मात्र, आरटीपीसीआर टेस्टिंगसाठी ठरवून दिलेल्या निवड स्थानांवर चाचणीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. या गर्दीतून कोरोनाचा अधिक प्रसार होत असल्याचे दिसत आहे. अशात ऑन कॉल टेस्टिंगची सुविधा देण्यात यावी, अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.
कोरोना पुन्हा एकदा फोफावला असून, लक्षण दिसताच चाचणी करवून घ्या, असे शासन-प्रशासनाकडून सांगितले जात आहे. यासाठी आरटीपीसीआर टेस्ट करणे गरजेचे असून, यासाठी टेस्टिंग सेंटर्स ठरवून देण्यात आले आहेत. यात अगोदर नाव नोंदणी करणे व त्यानंतर टेस्टिंगसाठी जावे लागते. मात्र, या सेंटर्सवर होत असलेली गर्दी बघता येथूनच कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाल्याचेही दिसत आहे. आपली टेस्ट करवून घेण्यासाठी नागरिक सेंटर्समध्ये जात असून, तेथील गर्दीत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांपासून अन्य निरोगी व्यक्तीही संपर्कात येऊन पॉझिटिव्ह होत आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
अशात मात्र आता शासन-प्रशासनाने ऑन कॉल टेस्टिंगची सुविधा नागरिकांना उपलब्ध करवून देण्याची मागणी जोर धरत आहे. ज्या व्यक्तींना आरटीपीसीआर टेस्ट करावयाची आहे, त्यांच्यासाठी संपर्क क्रमांक ठरवून दिल्यास तेथे संपर्क केल्यास संबंधित यंत्रणा त्या व्यक्तीच्या घरी जाऊन टेस्ट करून घेण्याची गरज आहे. असे झाल्यास टेस्ट सेंटर्स होणारी गर्दी कमी होणार व त्यापासून कोरोनाचा प्रसारही होणार नाही. शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू असून, सुविधाही दिल्या जात आहेत. अशात हा प्रयोग केल्यास नक्कीच कोरोनाला आळा घालण्यात यश येणार यात शंका नाही.
--------------------------------------
वृद्ध व आजारी व्यक्तींनाही दिलासा
आजारी असलेल्या तसेच वृद्ध व्यक्तीला टेस्ट सेंटरवर नेऊन त्यांची चाचणी करणे अत्यंत त्रासदायी ठरते. शिवाय सेंटरवर असलेल्या गर्दीतून त्यांना बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात घरीच आरटी-पीसीआर टेस्टिंगची सोय झाल्यास आजारी व वृद्धांना दिलासा मिळणार. घरीच त्यांची टेस्टिंग करून दिल्यास त्यांना त्रास होणार नाही. शिवाय हा प्रयोग अत्यंत सुविधाजनक व सुरक्षित ठरणार आहे.
------------------------------------
खासगी लॅबवाल्यांकडून लूट थांबणार
खासगी लॅबवाल्यांकडून सध्या एका टेस्टसाठी १८०० रुपये घेतले जात आहेत. सर्वसामान्यांना हे दर परवडणारे नाही. विशेष म्हणजे, शासनाने ठरवून दिलेल्या दरांना धुडकावून खासगी लॅबवाले आपली मक्तेदारी चालवीत असून, नागरिकांची लूट करीत आहेत. अशात शासनाने आरटीपीसीआरची घरीच टेस्ट करण्याची सुविधा करून दिल्यास खासगी लॅबवाल्यांकडून नागरिकांची होत असलेली लूट पण थांबणार.