आमगाव (गोंदिया) : वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय पातळीवरील पात्रता परीक्षेचा अर्थात नीट-२०२३ चा निकाल जाहीर होऊन काही तासही उलटले नाही. मात्र, तालुक्यातील नितीन नगर येथील विद्यार्थिनीने कमी गुण मिळाल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सलोनी रवी गौतम (१८) असे मृत तरुणीचे नाव आहे.
सलोनी ही राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट परीक्षेची तयारी करीत होती. काही दिवसांपासून ती तणावात असल्याची चर्चा आहे. मंगळवारी (दि. १३) रात्री नीटचा निकाल जाहीर झाला. रात्रीला सर्व झोपी गेल्यानंतर सलोनीने आपल्या अभ्यास खोलीत ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटे आई उठली असता ही बाब लक्षात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदन करिता येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. या घटनेला घेऊन गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
एमबीबीएस आणि तत्सम वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सलोनी ही कोचिंग क्लासेस चालविणारे रविकुमार गौतम यांची मुलगी व आमगाव पंचायत समिती सभापती राजेंद्र गौतम यांची पुतणी आहे. तिने २०२३ मध्ये इयत्ता बारावी उत्तीर्ण केले असून चांगले गुण मिळाले होते. त्यामुळे नीट परीक्षेतही आपल्याला चांगले गुण मिळतील, अशी तिची अपेक्षा होता; पण चांगले गुण न मिळाल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले.