गोंदिया : खरीप हंगामाला सुरुवात होताच खत, बियाणांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. नेमक्या याच संधीचा लाभ काही बोगस विक्रेते घेत असतात. असाच काहीसा प्रकार यंदादेखील पुढे आला असून, मध्य प्रदेशातील बोगस डीएपीची विक्री गोंदिया जिल्ह्यात केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी डीएपी खताची खरेदी करताना ते खत ओरिजनल आहे किंवा नाही याची खात्री करूनच खरेदी करावी.
तीन दिवसांपूर्वीच गोंदिया तालुक्यातील रतनारा येथील एका कृषी केंद्रावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून डीएपी खताच्या ३८ चुंगड्या जप्त केल्या. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. गोंदिया शहरातीलदेखील दोन तीन कृषी केंद्रांकडे या बनावट डीएपीचा स्टॉक असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यामुळे या पथकाने दोन दिवसांपूर्वी या कृषी केंद्रांना भेट देऊन गुदामातील खताचा साठा तपासणी केला. मात्र त्या ठिकाणी साठा आढळला नाही. दरम्यान, गोंदिया तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असताना त्यांना तेथील अधिकाऱ्यांनी नियमित तपासणी असल्याचे सांगत या प्रकरणाची माहिती देणे टाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यावर संशय निर्माण झाला. दरम्यान, ‘लोकमत’ने या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता मध्य प्रदेशातून गोंदिया जिल्ह्यात बनावट डीएपी खताचा पुरवठा केला जात असल्याची माहिती पुढे आली. विशेष म्हणजे बनावट डीएपी खताची चुंगडी हुबेहूब डीएपी खतासारखीच असून, त्याची किमतीसुध्दा सारखीच आहे. त्यामुळे हे खत बनावट असल्याची शंका शेतकऱ्यांना येत नाही. गोंदिया जिल्ह्याला लागूनच मध्य प्रदेशाची सीमा असल्याने या भागातून बियाणे आणि बनावट खतांचा पुरवठा होत असल्याची बाब समोर आली आहे.
...............
भरारी पथके गेली कुठे?
खरीप हंगामादरम्यान बोगस खते आणि बियाणांची विक्री होऊ नये, शेतकऱ्यांची दिशाभूल टाळण्यासाठी कृषी विभागाने तालुका आणि जिल्हा स्तरावर भरारी पथके गठित करण्यात आली आहेत. मात्र यानंतर बनावट खत जिल्ह्यात दाखल झाले असून, त्याची विक्रीसुद्धा सुरू आहे. त्यामुळे भरारी पथके नेमकी गेली कुठे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
.........
तालुका कार्यालयाकडून कारवाईची माहितीच नाही
गोंदिया तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून तालुक्यात बनावट डीएपी खताची विक्री होत असल्याची कुठलीच माहिती प्रसिद्धीस देण्यात आली नाही. शिवाय गोंदिया तालुक्यातील रतनारा येथे धाड टाकून कृषी विभागाच्या भरारी पथकाने ३८ बॅग बनावट युरिया खत जप्त केल्याची माहितीदेखील देण्यात आली नाही. त्यामुळे माहिती न देण्यामागील कारण कळू शकले नाही.
.................
कोट
कृषी विभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर दोन दिवसांपूर्वीच रतनारा येथील एका कृषी केंद्रावर धाड टाकून बनावट डीएपी खताच्या ३८ चुंगड्या जप्त करण्यात आल्या. तसेच गोंदिया येथेसुध्दा दोन तीन कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली. पण त्या ठिकाणी काहीच आढळले नाही.
- भीमाशंकर पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी, गोंदिया
.......