गोंदिया : महाविद्यालयासाठी शेतीच्या जमिनीला अकृषक दाखविण्यासाठी चक्क उपविभागीय अधिकाऱ्यांचे खोटे आदेश काढण्यात आले. यासाठी बोगस सही, शिक्का मारणाऱ्यावर डुग्गीपार पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सडक-अर्जुनी येथे के. एच. प्रशासकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी हा बोगसपणा करण्यात आला. नवप्रवर्तन सामाजिक बहुउद्देशिक शिक्षण संस्थेतर्फे हे महाविद्यालय सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सन २०१७ पासून आरोपी रोशन डोमाजी जांभूळकर (५२) याने गट क्र. १७६/२/११ आराजी ००.६० हे. आर ही शारदाबाई अशोक लांजेवार रा. सडक-अर्जुनी यांच्या नावाने असलेली जमीन स्वत:चे नावे असल्याचे दाखविले. त्या जमिनीचा सातबारा व गाव नमुना ८ तसेच उपविभागीय अधिकारी अर्जुनी/मोरगाव यांच्या नावाचे खोटे व बनावट आदेश पत्र, गोल शिक्का त्यावर बनावट सही करून या जागेचा अकृषक आदेश तयार केला. नवप्रवर्तन सामाजिक बहुउद्देशिक शिक्षण संस्थेव्दारे संचालित के. एच. प्रशासकीय महाविद्यालय सडक अर्जुनी या शाळेला मंजुरी मिळावी म्हणून आरोपीने एसडीओचे खोटे प्रमाणपत्र तयार करून महाविद्यालयाचे मंजुरी करीता मंत्रालय मुंबई येथे पाठविले. जांभूळकर याने सन २०१७ पासून आजपर्यंत शासनाची फसवणूक केली. सडक-अर्जुनी येथील मंडळ अधिकारी ब्रिजलाल दौलत वरखडे (५५) रा. मामा चौक, नूतन हायस्कूलजवळ गोंदिया यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी भादंविच्या कलम ४२०,४६८,४७१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक सचिन वांगडे करीत आहेत.