१७७० कारवाया : ५७.८५ लाखांची वसुली गोंदिया : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या यादीत गोंदिया जिल्हा कुप्रसिद्ध आहे. मात्र यावर तोडगा म्हणून महावितरणने कंबर कसली कसून वीज चोरांवर आपला फास आवळण्यास सुरूवात केली आहे. यातूनच महावितरणने वर्षभरात जिल्ह्यातील १७७० वीजचोरांवर कारवाया केल्या असून ८६ लाख ६६ हजार रूपयांची वीज चोरी उघडकीस आणली आहे. यातील ५७ लाख ८५ हजार रूपयांची वसुलीही या वीजचोरांकडून करण्यात आली आहे. वीज चोरीचे प्रकार सर्वत्र आहेत या काही शंका नाही. मात्र महावितरणच्या आकडेवारीनुसार गोंदिया जिल्ह्यात सर्वाधीक वीज चोरी असून याचाच फटका महावितरणला सहन करावा लागतो. आजही जिल्हावासीयांवर कोट्यवधीच्या घरात थकबाकी असून यातच वीजचोरीचे प्रकार अधिकची भर घालतात. परिणामी महावितरण अडचणीत येते. त्यामुळे वीज चोरीच्या प्रकारांवर आळा बसावा यासाठी वीज मंडळाने आता कंबर कसली असून वीज चोरांवर कारवाईचे सत्र राबविण्यात येत आहेत. यांतर्गत वर्षभरात मोठ्या प्रमाणात वीज चोरांवर धाड घालून त्यांच्यावर कारवाया करण्यात आल्या. यात एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत वीज मंडळाने जिल्ह्यातील १७७० वीज चोरांवर कारवाया करून ८६ लाख ६६ हजार रूपयांची वीज चोरी उघडकीस आणली आहे. करण्यात आलेल्या या कारवायांतील आकडा घालून व मीटर मध्ये छेडछाड करणाऱ्यांवर कलम १३५ तर अवैधरित्या वीज वापर करणाऱ्यांवर कलम १२६ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यातूनच वीज मंडळाने ५७ लाख ८५ हजार रूपयांची वसुली केली आहे. विशेष म्हणजे यातील ७५ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)
जिल्ह्यात वीज चोरांवर आवळला फास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2016 1:36 AM