लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : शिक्षणाचा गंध नसणाऱ्या गावात शिक्षणाचे रोपटे लावून त्याचे वटवृक्ष केले, एक दोन नव्हे तब्बल १७ वर्ष शासनाची चाकरी केली पण ऐन उमेदीच्या काळात काळाने जीवावर घाला घातला आणि अंशदायीच्या कचाट्यात सापडलेल्या त्या कर्मचाऱ्यांचे कुटूंब आजही सैरावैरा भटकत आहे. हे कुठल्या चित्रपटाचे कथानक नसून अंशदायी पेंशनच्या कचाट्यात सापडलेल्या एका मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाची व्यथा आहे.अनुहरलाल भोजराज जांभुळकर रा. वडेकसा देवरी असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी शासनाची तब्बल १७ वर्ष सेवा केली. पण शासनाने त्यांना अंशदायी पेंशनच्या कचाट्यात अडकविले. त्यांचे कुटूंब मदतीसाठी सैरावैरा भटकत आहे. शासनाकडून कुटूंबीयांना आधार तर सोडाच परंतु कपात केलेल्या रक्कमेची दमडी सुध्दा देण्यास नाकारले आहे.अनुहरलाल जांभुळकर यांनी ऐन उमेदीच्या काळात वयाच्या ३३ व्या वर्षी वडेकसा येथे वस्तीशाळा शिक्षकाची जबाबदारी स्विकारली. ऐनवेळी पत्नी मनोरुग्ण झाली, खर्च वाढला तरीही जबाबदारी चोखपणे बजावून ५ विद्यार्थ्यापासून सुरु केलेली शाळा ३७ विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविली. शासनाच्या निकषाप्रमाणे वयाच्या ४३ व्या वर्षी डीएड पूर्ण केले. २०१४ ला सहायक शिक्षक झाले पण दुर्दैवाने २०१७ मध्ये अल्प आजाराने त्यांचे आकस्मिक निधन झाले.कुटूंबातील कर्ता पुरूष गेला. आई आधीच मनोरुग्ण असल्याने जांभुळकर यांच्या मुलाचे फार हाल होत आहेत.इच्छा असुनही त्यांना शिक्षण सोडून, मोलमजुरी करावी लागत आहे. सलग १७ वर्ष सेवा देणाºया जांभुळकर यांच्या वेतनातून अंशदायी पेंशनची कपात झाली. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर दोन वर्ष लोटूनही शासनाकडून त्यांना दमडीची मदत करण्यात आली नाही.जांभुळकर यांचा मुलगा दिपेश शिक्षण सोडून गोंदियात काम शोधत आहे.तर लहान मुलगा वोकेश व मुलगी हिमानी गावातच मजुरी करुन उदरनिर्वाह करित आहे. याकडे लोकप्रतिनिधीनी लक्ष देऊन शासनाकडून मदत मिळवून देण्याची मागणी कुटूंबीयांनी केली आहे.जुनी पेन्शन लागू करामाझे बाबा २००१ पासून शासन सेवेत होते म्हणून त्यांना जुनी पेंशन योजना लागू करा किंवा सेवेत कायम २०१४ ला झाल्यामुळे शासनाकडून १० लाख रुपये मदतीच्या निर्णयानुसार १० लाख रुपये मदत मिळवून द्यावे.- दिपेश जांभुळकर, मृत कर्मचाऱ्याचा मुलगा.
१७ वर्षे सेवा देणाऱ्या मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला शासनाकडून दमडी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 9:57 PM