नियमांची मात्र ऐशीतैशी : वाहतूक पोलिसांची मूक भूमिका रावणवाडी : वाहनांचे एकाहून एक मॉडेल्स बाजारात येत असतानाच त्यांना शोभेशी नंबर प्लेट असावी यासाठी फँसी नंबर प्लेटचा कॅ्रझ वाढला आहे. यामुळे नंबर प्लेटसाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने ठरवून दिलेल्या नियमांची ऐशी-तैशी केली जात असल्याचे उघड आहे. असे असतानाही मात्र वाहतूक नियंत्रण शाखा दुर्लक्ष करीत असल्याचेही दिसून येत आहे. नवीन गाडी खरेदी करताच उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे तिची नोंदणी करवून नंबर दिला जातो. या नंबरवरून त्या गाडीची विभागाकडे नोंद असते व गाडीवर नंबर लिहिण्यासाठी विभागाने काही नियम ठरवून दिले आहेत. मात्र उपप्रादेशिक परिवहन विभागाने ठरवून दिलेल्या नियमांना तोडून वाहनांवर फँसी नंबर प्लेट लावल्या जात असल्याचा प्रकार चांगलाच फोफावला आहे. उघडपणे सुरू असलेला हा प्रकार बघूनही उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक नियंत्रण विभागाचे दूर्लक्ष आहे. वाहनाच्या नंबर प्लेटवर विभागाने ठरवून दिल्यानुसार फक्त नंबर टाकायचे आहेत. मात्र येथे नंबर प्लेटवर क्रमांक सोडून वाहनधारक कार्यरत असलेल्या विभागाचे नाव, वाहनधारकाचे किंवा त्याच्या परिवारातीस सदस्यांचीच नावे दिसून येतात. हा प्रकार पूर्ण जिल्ह्यातच असून सर्रासपणे नियमांची मोडतोड होत आहे. मात्र या वाहनधारकांना सोडून प्रामाणिक वाहनधारकांना विविध नियमांचा धाक दाखवून दंडित केले जात आहे. त्यामुळे संबंधित पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्य प्रणालीवर प्रश्न चिन्ह लागत आहे. समाजामध्ये चांगला संदेश जाण्याकरिता आरटीओ, पोलीस विभाग, वाहतूक विभागाकडून फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर कारवाई करून अशा नंबर प्लेट साफ करण्याची मोहीम राबवावी, अशी मागणी सूज्ञ नागरिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)
फँन्सी नंबर प्लेटची क्रेझ
By admin | Published: January 03, 2016 2:17 AM