नरेश रहिले, गोंदिया : शेळ्यांसाठी जंगलातील झाडांच्या फांद्या आणायला गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस घडली.
बसंतराव खेतराम ढोरे (४५) रा. कलपाथरी ता. गोरेगाव असे मृताचे नाव आहे. बसंतराव ढोरे हे १३ सप्टेंबर रोजी दुपारी बकऱ्यांसाठी झाडांच्या फांद्या आणायला तो मुंडीपार ते मुरदोली दरम्यान पालेवाडा जंगल परिसरात गेला होता. त्याच्यावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केला. सायंकाळ होऊनही बसंतराव घरी न पोहचल्याने घरच्यांना चिंता झाली. त्यांनी त्याची शोधाशोध केली परंतु त्याचा पत्ता लागला नाही. त्यांच्या नातेवाईकांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार गोरेगाव पोलिसात केली. पुन्हा १४ सप्टेंबर रोजी घरचे लोक नातेवाईकांच्या सोबत चालवित असतांना पालेवाडा जंगल परिसरात त्याचा मृतदेह सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आढळला.
या घटनेची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करण्याची कारवाई सुरू होती. गोंदिया तालुक्याच्या ढाकणी परिसरात मागील आठवडाभरापासून वाघाची दहशत होती. गोंदिया शहरानजीकच्या ढाकणी येथे दोन-तीन दिवस नागरिकांना वाघ दिसल्याने लोक दहशतीत होते. तोच वाघ मुरदोली जंगल परिसरात तर गेला नाही ना अशी शंका येते. या घटनेला वनविभागाने दुजोरा दिला आहे.