ग्रेडरची मनमानी : धान खरेदी केंद्र बंद, शेतकऱ्यांचे धान उघड्यावर अर्जुनी मोरगाव : बाक्टी (चान्ना) येथील गोदामात जागा नसल्याने धान खरेदी बंद झाली आहे. कित्येक शेतकऱ्यांचे धान खरेदी केंद्राबाहेर उघड्यावर पडले आहे. कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांची ससेहोलपट होत आहे. हे धान खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. प्राप्त माहितीनुसार, शासनाने आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू केले. तालुका खरेदी विक्री संघामार्फत धान खरेदी सुरू आहे. मात्र बाक्टी येथील केंद्रावर पर्याप्त सुविधा नाहीत. या केंद्रावर चान्ना, बाक्टी, येरंडी व इंजोरी ही गावे समाविष्ट आहेत. आजमितीस ३ हजार ४४७ पोती धान खरेदी झाली. चार गावांच्या शेतमालाच्या तुलनेत येथील गोदाम अपर्याप्त आहे. हे गोदाम पूर्णपणे भरल्याने २६ नोव्हेंबरच्या दुपारपासून खरेदी बंद करण्यात आली. बाक्टी येथील धान खरेदी केंद्र १६ नोव्हेंबर रोजी सुरू झाले. तत्पूर्वीच केंद्रावर अनेक शेतकऱ्यांनी धान विक्रीस आणले. धान खरेदी नोंदणी पुस्तिकेत क्रमवार नोंदणीची मागणी शेतकऱ्यांनी ग्रेडर शिवणकर यांच्याकडे केली. त्याने सातबाराच्या उताऱ्याची मागणी केली. तलाठ्यांचा संप असल्याने वेळेवर उतारे मिळणे अशक्य होते. नेमक्या या संधीचा लाभ घेवून काही नजीकच्या शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यात आले. येरंडी येथील गणेश बाबुराव ब्राम्हणकर या शेतकऱ्याने सातबाराचा उतारा देवून १० नोव्हेंबर रोजी म्हणजे धान खरेदी केंद्र सुरू होण्यापूर्वीच धान केंद्रावर आणले. १६ नोव्हेंबर रोजी केंद्र सुरू झाले. मात्र अद्यापही त्यांचा नंबर लागला नाही. उलट त्यानंतर धान खरेदी केंद्रावर विक्रीस आलेले धान खरेदी करण्यात आले. अद्यापही गोदामात आणखी शिल्लक असलेल्या जागेत धान समाविष्ट होऊ शकते. मात्र पूर्णपणे भरल्याचे कारण सांगून खरेदीच बंद करण्यात आली. या केंद्रावर अनेक शेतकऱ्यांचे धान उघड्यावर पडून आहेत. त्यांना अर्जुनी मोरगाव येथील केंद्रावर धान आणण्यास सांगितले जाते. यात वाहतूक व हमालीचा भुर्दंड शेतकऱ्यांवर अधिकचा बसणार आहे. या केंद्रावर जीर्ण असलेला बारदाना आहे. खरेदी झालेले पोतीही शासकीय बारदान्यात नसून सुमारे २०० ते २५० पोती विना छापा असलेली आहेत. यापूर्वी काही शेतकऱ्यांनी अर्जुनी केंद्रावर धान विक्रीसाठी नेले तेव्हा तुमचे बाक्टी केंद्र असल्याने तिथे घेवून जा, असे सांगण्यात आले. आता पुन्हा गोदाम पूर्ण भरले असल्याने तिथे घेवून जा, असे सांगण्यात आले. आता पुन्हा गोदाम पूर्ण भरले असल्याने अर्जुनी येथे नेण्यास सांगण्यात येते. ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टाच आहे. काही शेतकऱ्यांजवळ सातबाराचे उतारे नसतानाही त्यांचे धान घेण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. खरेदी केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. ग्रेडर हा केंद्र बंद असताना शेतकऱ्यांना मार्गदर्शन न करता विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाध्यक्षाच्या घरी बसून असतो, असा आरोप सोनू भोयर, रामचंद्र भोयर, गोपाल लोगडे, हिवराज बोरकर, गणेश ब्राम्हणकर, बाबुराव ब्राम्हणकर यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांची होतेय कुचंबना
By admin | Published: January 19, 2017 1:30 AM