केशोरी : या पूर्वीच्या काळात शेतीची सर्व कामे बैलजोडीच्या साहाय्याने केली जात होती. चालू वर्तमान काळात यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने, शेतकऱ्यांनी बैलजोड्यांचा वापर शेती व्यवसायात कमी करून, ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेती करणे सुरू केले, परंतु दररोज वाढणाऱ्या डिझेलच्या दरवाढीमुळे ट्रॅक्टरद्वारे शेती करणे कठीण झाल्याची व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरात ट्रॅक्टरद्वारे भाताची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. यापूर्वीच्या काळात सर्व शेतकरी बैलजोडीच्या साहाय्याने धानपिकाची शेती करतात. अधिक उत्पन्न देणाऱ्या धानपिकाच्या जाती विकसित झाल्यामुळे धान पीक चांगले होऊ लागले. शेतीची कामे झटपट आटोपण्याच्या नादात शेतकऱ्यांनी बैलजोडी पालन करणे सोडून, ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेत मशागतीची कामे सुरू केली. प्रत्येक शेतकरी शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा वापर करू लागला, परंतु आता दररोज वाढणाऱ्या डिझेलच्या दरामुळे धानाची शेती करणे कठीण झाल्याने बैलजोडीची आठवण होऊ लागली आहे. जसजशी महागाई वाढते, त्या प्रमाणात शेतमजुरांची मजुरी वाढते. मनुष्य बळाचा वापर कमी करण्याच्या दृष्टीने शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. निसर्गाच्या कृपेमुळे पाणी पाऊस चांगला झाला, तर योग्य धानपीक येण्याची खात्री असते, परंतु निसर्गाने अवकृपा केली, तर शेतीचे उत्पन्न कमी होऊन बळीराजाने आर्थिक बजेट बिघडत असते. शेतीला लागणारे महागाई औषधी, महागडी बियाणे आणि आता वाढलेल्या डिझेलच्या दरामुळे शेती करणे परवडण्यासारखे राहिले नाही, अशी व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.