मुंडीकोटा : कोरोना संसर्गाच्या विपरित परिस्थितीतही शेतकऱ्यांनी शेतात घाम गाळून धान पिकविला. हमीभाव आणि बोनसच्या आशेने शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली. हमीभावानुसार धानाचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले. मात्र खरीप हंगामातील पेरणीची वेळ आली तरी बोनस मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामात अडचणीत आले आहे.
कोरोना आणि नैसर्गिक संकटावर मात करीत शेतकऱ्यांनी शेतात धानाचे उत्पन्न घेतले. १८६८ रुपये हमीभाव आणि ७०० रुपये बोनस असा २५६८ रुपये भाव मिळणार या आशेने शेतकऱ्यांनी संपूर्ण धान शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री केला. शेतकऱ्यांना हमीभावानुसार चुकारे करण्यात आले. पण यावेळी पावसाळा सुरु झाला असून शेतकरी हा शेतीच्या कामात गुंतला आहे. मात्र आता धान विकून सहा महिने लोटूनही बोनसची रक्कम अद्याप त्यांना मिळाल. शेतकरी बोनसची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर बोनसची रक्कम मिळाली असती तर शेतकऱ्यांना बी-बियाणे, खत खरेदीसाठी सोयीचे झाले असते. आपल्या हक्काचे पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आता कर्जासाठी बँका आणि सावकाराच्या उंबरठ्यावर जाण्याची वेळ आली आहे. बियाणे खरेदीसाठी चणचण शेतकऱ्यांच्या हक्काचे बोनसचे पैसे शासनाकडे थकीत आहेत, दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँक पीक कर्ज देण्यास नकार देत असतात. आता आगामी खरीप हंगामासाठी बियाणे खरेदी कसे करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु शासकीय पातळीवर बोनसबाबत कोणत्याच हालचाली दिसत नाहीत. तरी शासनाने शेतकऱ्यांना विचार करुन व शेतकऱ्यांची परिस्थितीचा विचार करुन बोनस त्वरीत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.