सडक अर्जुनी : तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी उन्हाळी धानाची लागवड केली असून, धानाला सध्या पाण्याची गरज आहे. मात्र, महावितरणकडून केवळ पाच ते सहा तास कृषिपंपाला वीज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. कृषिपंपाला अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी डव्वा येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयावर शनिवारी (दि. ३) मोर्चा काढला.
डव्वा परिसरातील १५ ते २० गावांतील शेतकऱ्यांनी उन्हाळी धानाची लागवड केली आहे; पण कृषिपंपाला नियमित पाच ते सहा तासदेखील वीज पुरवठा होत नसल्याने धान पीक धोक्यात आले आहे. याबाबत वांरवार महावितरण कार्यालयाला निवेदन देऊन अखंडित वीज पुरवठा करण्याची मागणी केली होती; पण त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शनिवारी महावितरणाच्या कार्यालयावर धडक दिली. मात्र, बराच वेळ महावितरणचे अधिकारी आले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी चक्का जाम केला होता. अखेर डुग्गीपारचे ठाणेदार सचिन वांगळे यांनी मध्यस्ती करीत शेतकऱ्यांची समजूत काढली. उच्च दाबासह १२ तास वीज पुरवठा करण्याचे लेखी आश्वासन कार्यकारी अभियंता फुलझले यांनी शेतकऱ्यांना दिले. तसेच उर्वरित मागण्यांवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.