केशोरी : शासनाने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेवून प्रति क्विटल ७०० रूपये प्रमाणे बोनस रक्कम मंजूर केली आहे. परंतु अजूनही शासनाने बोनस रक्कम शेतकऱ्यांना प्रदान केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात शासनाप्रती रोष असून खरीप हंगामातील विकलेल्या धानाचे बोनस केव्हा मिळणार असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.
गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात उत्पादित केलेले धान पीक शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांना विकले. शेतकऱ्यांनी विकलेल्या धानावर प्रति क्विंटल ७०० रूपये प्रमाणे शासनाने बोनस रक्कम मंजूर करून शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा दिला होता. परंतु अजूनही मंजूर केलेली बोनस रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले नाही. त्यामुळे शासनाप्रती शेतकऱ्यांच्या मनात रोष व्याप्त आहे. यावर्षी खरीप हंगाम येवून ठेपला असून या खरीप हंगामासाठी लागणारे बि-बियाणे, औषध, खते इत्यादी खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांजवळ पैसा असणे आवश्यक आहे. खरीप हंगामातील बोनस रक्कम शेतकऱ्यांना मिळाली तर येत्या खरीपाचा खर्च भागविणे सहज शक्य होणार आहे. परंतु गेल्या वर्षीच्या खरीपातील बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. तत्काळ बोनस रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.