गोंदिया : विविध खत विक्रेत्या कंपन्यांनी खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ केली. खताच्या किमतींमध्ये तीन ते चारपट वाढ केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष होता. रासायनिक खतांच्या किमतींमध्ये वाढ केल्याने केंद्र सरकारवर चारही बाजूने टीका झाली. शेतकऱ्यांच्या रोषाचे असंतोषात रूपांतर झाले. त्यानंतर शासनाने खतांवरील अनुदानात वाढ करीत नवीन दराने खत विक्री न करण्याच्या सूचना खत निर्मिती कंपन्यांना केल्या. त्यामुळे विविध रासायनिक खते तयार करणाऱ्या कंपन्यांनी खतांचे जुनेच दर कायम ठेवले, मात्र काही विक्रेत्यांनी आधीच खतांची नवीन दराने उचल केली होती त्यामुळे त्यांनी त्याच दराने विक्री केली. अनेक शेतकरी खरीप हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच खते, बियाणे यांची खरेदी करून ठेवतात. खताचे दर कमी होतील याची कल्पना नसल्याने त्यांनी वाढीव दरानेच खतांची खरेदी केली. यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड बसला आहे. खतांच्या नवीन आणि जुन्या दराची खात्री करण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागातील आणि ग्रामीण भागातील काही कृषी केंद्रांना भेटी देऊन दराची माहिती घेतली असता काही विक्रेते नवीन वाढीव दरानेच शेतकऱ्यांना खतांची विक्री करीत असल्याचे दिसून आले. केंद्र सरकारने खतांची जुन्याच दराने विक्री करण्याचे आदेश काढले असले तरी हे आदेश अद्यापही मिळाले नसल्याचे काही खत विक्रेते सांगत आहेत. शेतकऱ्यांनी चौकशी केली नाही तर सरार्सपणे त्यांना वाढीव दरानेच खताची विक्री करीत असल्याचा प्रकारसुध्दा निदर्शनास आला.
...........
खतांचे नाव जुने दर नवीन दर सद्या विक्रीचे दर
१०.२६.२६ ११७५ १७७५ ११९६
१२.३२.२६ ११९० १८९० ११९७
२०.२०.० ९७५ १३५० ९८५
डीएपी ११८५ १९०० १२२०
...............................................
खतांचे नवीन दर सद्या विक्रीचे दर
१०.२६. २६ ११७५
१२.३२.२६ ११८५
२०.२०.० ९७५
डीएपी ११८५ १२००
...........................,.......
जिल्ह्यातील खरिपाचे एकूण लागवड क्षेत्र : २ लाख १० हजार हेक्टर
.........
हे घ्या पुरावे
आदेश न मिळाल्याचे सांगत वाढीव दराने विक्री
शहरापेक्षा ग्रामीण भागातील कृषी केंद्रांवर अधिक घोळ दिसून आला. काही विक्रेत्यांनी आम्हाला नवीन दराने खताचा पुरवठा झाला आहे, तर दरात कपात केल्याचे पत्र अद्यापही आम्हाला मिळालेले नाही. त्यामुळे वाढीव दरानेच शेतकऱ्यांना खतांची विक्री करीत असल्याचे आढळले. त्यामुळे खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल सुरूच आहे.
................
पत्रानुसार दरकपात नाही
खत निर्मिती कंपन्यांनी २० मे रोजी पत्र काढून खतांचे वाढविले, दर कमी करीत असल्याचे पत्र काढले. तसेच कोणत्या दराने खताची विक्री करावी यासंदर्भात पत्रात स्पष्ट उल्लेख केला आहे; पण प्रत्यक्षात काही कृषी केंद्रांना भेटी देऊन याची चाचपणी केली असता खत विक्रेते वाढीव दरानेच खताची विक्री करीत असल्याचे आढळले.
.........
शेतकऱ्यांना बसला भुर्दंड
जिल्ह्यातील अनेक शेतकरी खरीप हंगाम महिनाभरावर असतानाच खते आणि बियाणांची खरेदी करून ठेवतात. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना वाढीव दराने खताची खरेदी करावी लागली. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. आता केंद्र शासनाने खतांच्या किमती कमी केल्या असल्या तरी याचा फायदा या शेतकऱ्यांना मिळणार नाही.
.............
कोट
माझी पाच एकर शेती असून, मी दरवर्षी खरीप हंगामाच्या महिनाभरापूर्वीच खतांची खरेदी करीत असतो. यंदा खतांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. मात्र ऐनवेळी गैरसोय नको म्हणून वाढीव दरानेच खतांची खरेदी केली. मात्र आता दर कमी झाले असले तरी त्याचा आम्हाला फायदा झाला नाही.
- दिवाकर बिसेन, शेतकरी
........
खतांचे वाढलेले दर कमी होतील अशी आशा नसल्याने मी वाढीव दरानेच खतांची खरेदी केली. मात्र दर कमी झाले. मला आर्थिक भुर्दंड बसला.
- राजू बारसागडे, शेतकरी