लोकमत न्यूज नेटवर्कइसापूर : शेतात पिकांची राखण करीत असलेल्या शेतकऱ्यांवर अस्वलाने अचानक हल्ला केला. यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि.६) सकाळी आठ वाजताच्या दरम्यान अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटखेडा येथे घडली.केशव झिलपे असे अस्वलाच्या हल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. जखमींमध्ये महादेव लोणारे, शंकर भागडकर व निलेश भागडकर यांचा समावेश आहे. सर्व जखमींवर अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन नागपूर येथे हलविण्यात आले. सध्या रब्बी हंगाम सुरू असून या परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात चना, गहू, तूर, उडीद मूंग या पिकांची लागवड केली आहे. वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी पिकांची राखण करण्यासाठी सकाळीच शेतावर जातात. केशव झिलपे व त्यांच्या धुºया लगतचे शेतकरी शनिवारी सकाळीच शेतावर राखणीसाठी गेले होते. दरम्यान राखण करीत असताना अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. यात झिलपे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर याच अस्वलाने बाजुच्या शेतात राखण करित असलेल्या तीन जणांवर हल्ला केला. यात तिघेही गंभीर झाले. दरम्यान त्यांनी आरडाओरड केल्यानंतर आजुबाजुच्या शेतातील शेतकरी त्यांच्या शेताकडे धावून आले. त्यांनी अस्वलाला पिटाळून लावले. तसेच जखमींना रूग्णालयात दाखल केले. दरम्यान घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. हा परिसर नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाला लागून असल्याने या भागात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. मात्र मागील काही दिवसांपासून या भागात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सी.जी.रहांगडाले यांनी कर्मचाºयांसह घटनास्थळी पोहचून पंचनामा केल्याची माहीती आहे.
अस्वलाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 12:19 AM
शेतात पिकांची राखण करीत असलेल्या शेतकऱ्यांवर अस्वलाने अचानक हल्ला केला. यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि.६) सकाळी आठ वाजताच्या दरम्यान अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटखेडा येथे घडली.
ठळक मुद्देतीन जण जखमी : इटखेडा परिसरातील गावकऱ्यांमध्ये दहशत