रावणवाडी : धानाला सध्या युरियाची गरज असून, शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, जेथे कुठे युरिया मिळत असला तरी दुप्पट भावाने त्याची विक्री केली जात असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. जिल्हाधिकारी व कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी ही समस्या सोडवावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
खरिपातील धान टाकून आता दोन महिने होत आहेत. गर्भावस्थेत असलेल्या धानाच्या रोपट्यांना आता युरियाची गरज आहे. मात्र कृषी केंद्रांवर युरिया नसल्याने पावसामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना आता युरियाने अडचणीत टाकले आहे. बाजारात युरिया नसल्याने ज्या कुणा कृषी केंद्रात जुना साठा आहे ते मात्र आता दुप्पट भावाने युरिया विकत आहे. आता उपाय नसल्याने मजबूरन शेतकरी दुप्पट भावात युरिया खरेदी करून पिकांना टाकत आहे. अशात आता जिल्हाधिकारी व कृषी विभागाने ही समस्या सोडवावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
दुप्पट भावात मिळतो युरिया
पिकांना युरियाची गरज असतानाही कृषी केंद्रांवर युरिया मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांना दुप्पट भावात युरिया खरेदी करावा लागत आहे. अधिकाऱ्यांना याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- प्यारेलाल तुरकर (शेतकरी, गर्रा)
--------------------------------
खत न मिळाल्यास होणार नुकसान
युरिया मिळत नसल्याने धानाच्या रोपट्यांची उंची वाढत नाही. पावसाचा अभाव त्यात आता युरियाची समस्या अशात यंदा परत खरिपात शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे.