तिरोडा : जिल्ह्यात को-ऑपरेटिव्ह बँकेने आतापर्यंत कर्ज विम्याचे हप्ते कपात केलेले आहेत. तेव्हा या कर्ज विम्याचा पैसा कोणत्या विमा कंपनीकडे वर्ग केला ही बाब शेतकऱ्यांना माहीत नाही. तसेच कर्ज विम्याच्या कपात केलेल्या पैशाची पोहोच किंवा पॉलिसी शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांकडून कर्जावर विमा कपात केला जातो; परंतु जेव्हा-जेव्हा नैसर्गिक आपत्ती येथे व पिकाची नुकसान होते तेव्हा आपण कर्जाचे हप्ते भरू शकत नाही.
त्यावेळी ही बँक आपल्याला विम्याचा कोणता लाभ देते. उलट आपण बँक कर्जावरील हप्ता न भरल्यास थकीत कर्ज खात्यात नाव जाते आणि थकीत रकमेसह आपल्यावर चक्रव्याज आकारले जाते. तेव्हा कर्ज विम्याचा उद्देश काय? कशाकरिता बँक कर्ज विमा कपात करते? असा सवाल माजी आ. दिलीप बन्सोड यांनी केला आहे. या बाबीवर बँकेच्या संचालक मंडळाने गंभीरता दाखविण्याची गरज आहे. या २०२१-२०२२ च्या खरीप हंगामात पीक कर्ज घेताना शेतकऱ्यांनी कर्ज विमा कपात करू देऊ नये? जर कुठल्याही सेवा सहकारी संस्थेने पीक कर्ज विमा कपात केल्यास ती रक्कम परत मागावी. आतापर्यंत कपात केलेल्या पीक कर्ज विम्याचा हिशेब कुणाकडेच नाही. त्यामुळे ही रक्कम नेमकी गेली कुठे याचेसुद्धा स्पष्टीकरण होणे गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने पीक कर्ज विम्याच्या नावाखाली कपात केल्या जाणाऱ्या रकमेचा हिशेब देण्याची मागणी माजी आ. दिलीप बन्सोड यांनी केली आहे.