जि.प. बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : नाल्यावर पूल तयार कराआमगाव : दरदिवशी तालुक्यातील शेतकरी शेतमजुर नगरात रोजीरोटीसाठी तसेच विविध कामे घेऊन येतात. गोरठा, ठाणा, बोथली या ठिकाणचे नागरिक गोरठा मार्गे रिसामा व नंतर नगरात प्रवेश करतात. मात्र या रस्त्यावरुन जाणे म्हणजे संकट ओढविणे आहे. याबद्दलची कल्पना जिल्हा परिषद बांधकाम विभागाला आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे या मार्गावर शेतकरी, शेतमजुरांची खरी कसरत होत आहे.या मार्गावर प्रथम नाल्यावर पुल होणे अत्यंत गरजेचे आहे. नाल्याच्या रूंदीकरणामुळे जाणाऱ्या-येणाऱ्यांची मोठी पंचाईत होत आहे. जीव मुठीत घेऊन या नाल्यातून अनेकांना प्रवास अनेक वर्षापासून सुरु आहे. नाल्याच्या आतील भागात खोलपणा व चारही बाजूला झुडूप असल्याने समोरुन कोण येतो याची जाणाऱ्या व्यक्तीला कल्पना नसते. तसेच याच मार्गावरुन ट्रॅक्टरची वाहतूक नेहमी असते. या मार्गाला लागून अनेकांनी माती मुरुम खोदकाम करुन रस्त्याला लागून मोठ्या खाईचे रूपांतर खड्ड्यात झाले आहे. चालकाचा अनवधनाने लक्ष राहिले नाही तर रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात वाहन किंवा सायकलस्वार गेल्याशिवाय राहणार नाही. सदर रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात आहे. मात्र या मार्गावरील पुलाची समस्या मिटविण्याकरिता अधिकाऱ्याची तत्परता आजतागायत दिसली नाही. जिल्हा परिषद बांधकाम विभाग आमगाव येथील उपविभागीय अभियंता वाघाये यांना या मार्गावरील समस्याचे अवलोकन झाले नसेल किंवा शाखा अभियंता विजय ढोमणे यांनी याबद्दल कल्पना कदाचित वरिष्ठांना दिली नसेल असा सूर परिसरात आहे. शाखा अभियंता यांची कार्यप्रणाली बरोबर नसल्यामुळे व त्यांना येथे बराच कालावधी लोटल्याने त्यांच्या स्थानांतरणाची मागणी होत आहे. (वार्ताहर)
गोरठा-रिसामा रस्त्यावर शेतकऱ्यांची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2016 2:48 AM