जलयुक्त शिवार अभियान : कामातील भ्रष्टाचाराची चौकशी कराकाचेवानी : जलयुक्त शिवार अभियानाच्या भातखाचर कामात व पाणलोट योजनेच्या कामात भ्रष्टाचार व अपहार करण्यात आला. या कामाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात याव्या, या मागणीसाठी तिरोडा तालुका कृषी कार्यालयासमोर बरबसपुरा-काचेवानी येथील शेतकऱ्यांनी शनिवारपासून (दि.४) उपोषण सुरू केले आहे.कृषी विभागांतर्गत सन २०१५ मध्ये जलयुक्त शिवार अभियान व पाणलोट योजनेंतर्गत भातखाचरची कामे करण्यात आली. ही कामे निकृष्ट असून यात भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे. त्यामुळे केलेल्या कामांचे २४ गावांच्या ग्रामपंचायतींना सविस्तर अंदाजपत्रकाच्या झेरॉक्स प्रति, सहायकांची दैनंदिनी, एम.बी. रेकार्डच्या प्रति देण्यात यावे. तसेच बरबसपुरा व काचेवानी गावांचे रेकार्ड चार दिवसांत देण्यात यावे, कामांची चौकशी करून उर्वरित कामे पूर्ण करण्यात यावी, केलेल्या कामाची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी, चुकीची कामे व बिले काढणाऱ्यांना निलंबित करून पोलिसात गुन्हे दाखल करावे, संपूर्ण तालुक्याच्या कामांची चौकशी एसीबीकडून करावी, समिती नेमून संपूर्ण पाच वर्षांच्या कामाची तपासणी करावी, माहिती अधिकाराखाली माहिती मागणाऱ्यांना तत्काळ देण्यात यावी, करण्यात येणाऱ्या कामांची माहिती व अंदाजपत्रके ग्रामपंचायतींना द्यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांचे उपोषण सुरू
By admin | Published: April 06, 2016 1:58 AM