परसवाडा (गोंदिया) : तिरोडा तालुक्यातील नागझिरा व कोका अभयारण्यालगत असलेल्या जंगल परिसरातील ग्राम नवझेरी येथे बिबट्याने मागील २ महिन्यांपासून चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अशातच बुधवारी (दि.२) रात्री ११ वाजताच्या सुमारास बिबट्याने रामकृष्ण जगन्नाथ निमजे यांच्या घरातील शेळी ठार केली, तर नामदेव शिवरू उके यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले आहे.
रात्री बिबट्याने निमजे यांच्या घरात बांधलेल्या शेळीवर हल्ला करून शेळीला ठार केले. मात्र, शेळीच्या आवाजाने समोर राहणारे नामदेव उके उठले व घराच्या बाजूला लघुशंकेला गेले असता त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने त्यांच्या चेहऱ्यावर पंजा मारून जखमी केल्याने त्यांना रात्री उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत वन विभागाचे बिट गार्ड कडवे यांना फोनद्वारे कळविण्यात आले; पण ते रात्री आले नाही. वन विभागाचे कर्मचारी रात्रपाळी पेट्रोलिंगसुद्धा करीत नाहीत. जंगलातील वनतळी, हँडपंप व सौरउर्जा पंप बंद असल्याने पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेत असल्याचे बोलल्या जाते. यामुळे आता वन्यप्राण्यांकडून गावात जनावरांची शिकार तसेच गावकऱ्यांवर हल्ल्याचे प्रकार घडत आहेत. वन विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याने नवेझरी परिसरातील नागरिकांत दहशत पसरली आहे. दर दोन-चार दिवसांत या परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडत असतात. काही दिवसांपूर्वी ग्राम माल्ही येथे बिबट्याचा मृत्यू झाला. यावरून वन विभाग वन्यजीवांची किती काळजी घेतो हे लक्षात येते. वन विभागाकडून आर्थिक मोबदल्याची मागणी निमजे, उके व सरपंच महेंद्र भांडारकर यांनी केली आहे.