केशोरी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसरात गेल्या १५ दिवसांच्या कालावधीनंतर मंगळवारपासून पावसाची सुरुवात झाल्याने या परिसरातील शेतकरी सुखावला आहे. आश्लेषा नक्षत्राने मारले, मात्र मघा नक्षत्राने शेतकऱ्यांना तारले, असे आनंदाने उद्गार काढत शेतकऱ्यांना पावसाने आनंदित केले आहे.
या वर्षीच्या खरीप हंगामासाठी मृग नक्षत्राच्या प्रारंभापासूनच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे धान पिकाच्या पेरण्या योग्यवेळी शेतकऱ्यांना करता आल्या. मृग नक्षत्रानंतर येणारे पुष्प नक्षत्र हेसुद्धा आवश्यकतेनुसार पडत राहिले. यावेळी धान पिके चांगलीच बहरली. परंतु, करपा या रोगाने थोडाफार कहर केला. वेळीच औषध फवारणी करून उपाययोजना केल्यामुळे करपा रोग आटोक्यात आला. धानातील निंदन आणि खतांची मात्रा योग्य वेळी दिल्याने धानाची पिके हिरवीगार दिसू लागली आहेत. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून या परिसरात पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे शेतकरी धास्तावला होता. पावसाचा अर्धा कार्यकाळ संपला तरीही तळे, बोड्या भरल्या नाहीत. परिणामी पाण्यापासून तहानलेल्या आहेत. परंतु, मंगळवारपासून (दि. १७) या परिसरात पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरीवर्ग आनंदित झाल्याचे दिसून येत आहे. आश्लेषाने मारले, मात्र मघा नक्षत्राने तारले, असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही, असे वाटते.