सालेकसा : आधी सर्व शेतकऱ्यांना सातबारा आनलाईन करण्यासाठी मुदत वाढवून द्या आणि त्यानंतरच धान खरेदी करा, अन्यथा कोणाचेही धान खरेदी करु देणार नाही, अशी भूमिका घेत आदिवासी महामंडळाच्या दरेकसा येथील धान खरेदी केंद्राला बुधवारी (दि.१६) परिसरातील शेतकऱ्यांनी कुलूप ठोकून धान खरेदी बंद केली.
यंदा रब्बी पिकातील धान खरेदीसाठी सातबारा ऑनलाईनची मुदत ३० एप्रिलपर्यंतच होती. तेव्हा शेतकऱ्यांनी ओरड करताच पुन्हा दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. खरीप हंगामाच्या धानाची उचल झाली नसल्याने रब्बीचा धान खरेदी होणार की नाही या गोंधळामुळे शेकडो शेतकरी सातबारा ऑनलाईन करण्यात मुकले. परंतु आश्रम शाळांमध्ये धान साठवून ठेवण्याची परवानगी मिळाल्यावर आदिवासी महामंडळाची धान खरेदी सुरु करण्यात आली. अशात शासनाने आनलाईनची मुदतवाढ करणे गरजेचे होते. यासाठी शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधीसह जिल्हाधिकाऱ्यांना सुध्दा निवेदन दिले परंतु शासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अनेक शेतकरी धान विक्री करण्यास मुकत आहे तर खरेदी केंद्रावर काही मोजक्याच शेतकऱ्यांचे धान पोहचत आहे. अशात वंचित शेतकऱ्यांनी संतप्त होऊन दरेकसा येथील धान खरेदी केंद्राला कुलूप ठोकले. मागणी पूर्ण न झाल्यास तहसील कार्यालयासमोर धरणे व उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
.......
शेकडो शेतकरी राहणार वंचित
रब्बी हंगामातील धानाची शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी सातबारा ऑनलाईन अट शासनाने टाकली होती. मात्र याच दरम्यान लॉकडाऊन असल्याने अनेक शेतकऱ्यांना सातबारा आनलाईन करता आला नाही. त्यामुळे त्यांना शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विकण्यापासून वंचित राहावे लागत आहे. तसेच अल्प दराने खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागत आहे.